उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार समर्थन मेळावा

आ. नितेश राणे यांची माहिती

राजापूर | प्रतिनिधी : प्रकल्पाची कोकणाला किती गरज आहे आणि प्रकल्पाच्या बाजूने किती समर्थन आहे हे सर्वांसमोर आणण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एक मेळावा घेणार असल्याची घोषणा देवगडचे आमदार नितेश राणे यानी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे . कोकणातील बेरोजगारी संपली पाहिजे , इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी रिफायनरी सारख्या प्रकल्पाची इथे गरज असल्याचे मत त्यानी बोलताना मांडले . यावेळी त्यानी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली . आज उपस्थित असणारे समर्थक ही केवळ समर्थनाच्या ताकदीची झलक आहे . आज पर्यंत कधीही समर्थनाची बाजू दाखवली गेली नाही मात्र किरकोळ असलेला विरोध मोठा करुन दाखवला असेही ते म्हणाले .रिफायनरी प्रकल्पाची कोकणाला काय गरज आहे हे सर्वाना पटवून देण्यासाठी जेव्हा आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची सभा बारसु परिसरात होइल तेव्हा या प्रकल्पाच्या समर्थनाची ताकद पाहून उध्दव ठाकरे पुन्हा कोकणात पाउल ठेवण्याची हिम्मत करणार नाहीत असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले .