Instead of advocating for an alliance, make a friendly fight as a ‘special case’
केसरकर यांना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आव्हान
विकास केला तर निवडणूकीत युतीची गरज का भासते
सावंतवाडी । प्रतिनिधी : मतदासंघात केवळ एक ग्रामपंचायत असताना मी ३० हजार मते घेतली. तर दुसऱ्यावेळी अपक्ष म्हणून लढताना जनतेने ५७ हजार मते दिली. पराभव तर इंदिरा गांधींचाही झाला होता. त्यामुळे केसरकर यांनी गुर्मीत व घमेंडीत राहू नये. युतीची भाषा करण्यापेक्षा या मतदारसंघात ‘स्पेशल केस ‘ म्हणून मैत्रीपूर्ण लढा, एकदाच काय ते होऊन जाऊ दे, असे खुले आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सावंतवाडीतील जनता राजन तेली यांना स्वीकारणार नाही त्यांची पराभवाची हॅट्रिक होईल अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती त्याला उत्तर देताना राजन तेली यांनी केसरकारांनाच स्वबळावर लढण्याचे प्रति आव्हान दिले.
यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगांवकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
सावंतवाडी मतदार संघात युती न करता जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवूया. यात ज्याचं प्राबल्य येईल त्याला संधी द्यावी. तुम्ही जिंकलात तर मी बाजूला होतो अन्यथा तुम्ही बाजूला व्हा, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.
केसरकरांची या मतदारसंघात ताकद होती तर मतदारसंघातील वेंगुर्ले सावंतवाडीसह दोडामार्ग नगरपालिका भाजपकडे कशी जिंकली. मतदार संघातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्वाधिक जागा भाजपच्या
ताब्यात आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतवर देखील भाजपचीच सत्ता आहे. सहकारातही आमचेच वर्चस्व आहे. तर मग विधानसभेच्या जागेवर हक्क कसला सांगता, असा सवालही त्यांनी केला.
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदार संघात विकास सुरु आहे. ना. चव्हाण यांनी आपल्या कोट्यातील २४ टक्के निधी शिवसेनला दिला. मात्र, केसरकर पालकमंत्री असताना भाजपला किती निधी दिला तो त्यांनी जाहिर करावा, असे आव्हान राजन तेली यांनी दिला.
१९९० – ९१ पासून ताज ग्रुप ची जागा तसेच सिजा दी गोवा ची जागा पडून आहे. तुम्ही आमदार व मंत्री होता मग इथे काहीही का होऊ शकले नाही. नारायण राणे उद्योगमंत्री असताना आडाळी एमआयडीसी मंजूर केली. त्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या काळात एकही उद्योग का येऊ शकला नाही. बंद टाटा मेटॅलिक का सुरु झाली नाही. सातार्डा येथील उत्तम स्टीलचं काय झालं. आता कोणाला तरी हॅलिकॉप्टर मध्ये फिरवून लोकांची दिशाभूल का चालवली आहे, असा सवालही राजन तेली यांनी उपस्थित केलं.
पर्यटनाच्या माध्यमातून आंबोली, चौकुळ, गेळे त्याचप्रमाणे किनारपट्टीच्या भागाचा विकास व्हावा अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे आडाळी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणीही आम्ही केली आहे.