वळकेत बौद्ध जयंती उत्साहात साजरी

 

भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक प्रमोद सावंत यांचा विशेष सत्कार

रत्नागिरी | प्रतिनिधी : भारतीय बौध्द महासभा प्रणित बौध्द विकास सेवा मंडळ वळके (ग्रामीण-मुंबई) आणि महिला मंडळ वळके यांच्या संयुक्त विद्यमाने महाकारुणिक तथागत गाैतम बुद्ध यांची २,५८६ वी जयंती वळके येथे शनिवारी (६ मे २०२३) उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक बौद्धवाडीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक मा. प्रमोद यशवंत सावंत यांचा हस्ते धम्म ध्वज फकविण्यात आला. त्यानंतर बौद्ध विहारात सामूहिक पद्धतीने बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळी रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु. अनंत सावंत गुरुजी यांनी उपस्थित बांधवांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. बौद्ध अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून विहारात आलेले पाहायला मिळत होते. हातात पंचरंगी व निळे ध्वज घेवून बुद्ध चरणं गच्छामीचा जयघोष करित शिस्तबद्ध निघालेली रॅली सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. यावेळी बुद्ध अनुयायांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. विहारात तथागत बुद्ध यांना वंदन करण्यात अनुयायांची रेलचेल होती. बौद्ध उपासकांनी एकमेकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी आंबेडकर व बुद्ध गीतांचे सूर निनादत होते.

निवृत्त सैनिक प्रमोद सावंत यांचा विशेष सत्कार

गावाच्या सुपुत्राने देशाचे रक्षण केल्याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरूण पिढीने घ्यायला हवा, या हेतूने तसेच सेवानिवृत्त सैनिकाप्रती आणि भारतीय सैन्यात आपली सेवा देणाऱ्या तमाम सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त होईल, म्हणून सैन्य दलातील निवृत्त सैनिक मा. प्रमोद यशवंत सावंत यांचा सन्मान करण्याचे भारतीय बौध्द महासभा प्रणित बौध्द विकास सेवा मंडळ वळके मंडळाने ठरविले होते. ग्रामीण-मुंबई या दोन्ही मंडळाच्या वतीने भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक मा. प्रमोद यशवंत सावंत यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच त्यांची पत्नी माधवी प्रमोद सावंत यांचा देखील सत्कार करण्यात आला.

निवृत्त सैनिक मा. सावंत हे सन २००१ रोजी भारतीय सैन्य दलामध्ये मोठ्या जिद्दीने व मेहनतीने भरती झाले. आणि सन २०२२ या वर्षी सेवानिवृत्त होऊन वळके गावी परतले. या २० वर्षाच्या कालावधीत त्यांनी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता आपल्या भारत देशाची सेवा बजावली. यामुळे बौध्द विकास सेवा मंडळ आणि मौजे वळके गावाची शान उंचावली आहे. सावंत हे सेवानिवृत्त होऊन वळके गावी परतल्यानंतरही समाजसेवा करत असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या या कर्तुत्वाची दखल घेत बौध्द विकास सेवा मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.