खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील शिरवली नं.१ वर्गखोल्यांच्या दुरूस्तीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाळ्यात कोसळलेल्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसह अन्य कामांसाठी १० लाख रूपयांच्या निधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली आहे. दुरूस्तीसह वर्गखोल्यांच्या रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. लवकरच विद्यार्थी नव्या वर्गखोल्यांमध्ये धडे गिरवणार आहेत. यामुळे पालकांनी आतापासूनच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
जुलै महिन्यात शिरवली नं.१ प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे छत कोसळले होते. इ. १ली ते ७वीपर्यंत वर्ग असणाऱ्या धोकादायक शाळेत पालकांनी विद्यार्थ्यांना न पाठवण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. सलग ६ दिवस विद्यार्थ्यांअभावीच शाळा भरत होती. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थ, पालक आक्रमक झाले होते. पंचायत समितीच्या आवारात विद्यार्थ्यांचे वर्ग भरवण्याची तंबीही शिक्षण विभागाला
दिली होती.
या मुळे अंगणवाडीत वर्ग भरवण्याची तयारी दर्शवत आजमितीसही त्याचठिकाणी विद्यार्थी अध्ययन करत आहेत. ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजनामार्फत जि.प.च्या बांधकाम विभागाने वर्गखोल्यांच्या दुरूस्तीचे काम वेगाने सुरू केले. लवकर वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्याबाबत सूचना संबंधित ठेकेदाराला करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वर्गखोल्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. सद्यस्थितीत लाद्या बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी विष्णू शिवगण, अर्जून शिंदे, चंद्रकांत जोगले, विजय घुमे यांसह ग्रामस्थांनी मेहनत घेतली.











