सिंधुदुर्ग I मयुर ठाकूर : सिंधु मरीन कन्सल्टन्सी, सिंधुदुर्ग आणि पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण यांच्या संयुक्त विद्यमाने पोईप हायस्कूल येथे मर्चंट नेव्ही कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर कॅप्टन दिलीप मांजरेकर, चीफ इंजिनिअर रविंद्र सावंत, प्रविण खानोलकर, अँव्हिक ओशनचे डायरेक्टर अनिल सिंग, असिस्टंट डायरेक्टर राजीव सिंग, इंडियन नेव्हीचे बी. डी. सिंग, श्री. पाटील, क्रुज मॅनेजर दिपक कुमार, पोईप सर्कल एज्युकेशनचे अध्यक्ष अनिल कांदळकर, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, सचिव विलास माधव, संचालक श्रीकृष्ण माधव, सत्यवान पालव, मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार व व्ही. व्ही. महाजनी उपस्थित होते.
Merchant Navy workshop concluded at Pope High School..!
यावेळी बोलताना कॅप्टन मांजरेकर यांनी आपले शिपवरील अनुभव कथन केले व मर्चंट नेव्हीबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये भरती होऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी व आपले करियर घडवावे असे प्रतिपादन केले. तर चीफ इंजिनिअर रविंद्र सावंत यांनी क्षमता असूनही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नेव्हीतील प्रमाण अत्यल्प असल्याची खंत व्यक्त करत ग्रामीण भागातील पालकांनी आपली मानसिकता बदलून मुलांना प्रोत्साहन देणे किती महत्त्वाचे आहे हे सांगताना आपला नेव्हीतील प्रवासही कथन केला.
संस्थेचे अध्यक्ष अनिल कांदळकर यांनी आपल्या भाषणात सिंधु मरीन ग्रामीण भागात करत असलेल्या जागृतीचे कौतुक केले तर मुख्याध्यापक व्ही एन कुंभार यांनी अशा प्रकाराचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबाबत सिंधु मरीनचे कौतुक करत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या वेळी टी. एस रहमान इन्स्टिटय़ूटमधून ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरमध्ये प्रथम आलेला यश बांदेकर, उद्देश गावकर व संस्था अध्यक्ष, सचिव, संचालक, कॅप्टन, चीफ इंजिनिअर, प्रशालेचे मुख्याध्यापक, तसेच अँव्हिक ओशनचे डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर यांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधु मरीनचे ऋषिकेश नाईक, विनायक मालवणकर, संजय जाधव, सुनील सुब्रमण्यम तसेच प्रशालेचे शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश नाईक यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. नचिकेत पवार यांनी केले. कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.