सीए चैतन्य वैद्य यांनी इनपुट कर सवलतीबाबत केले मार्गदर्शन

 

सीए शाखेतर्फे सेमिनार

रत्नागिरी : इनपुट कर सवलतीच्या (ITC) ताळमेळ प्रक्रियेत दिवसेंदिवस वाढणारी गुंतागुंत आणि जीएसटीएन पोर्टलवर होणारे सतत बदल यामुळे ही प्रक्रिया अधिक कठीण बनत आहे. या बदलांबद्दल जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यामुळेच अशा सेमिनार्सचे महत्त्व अधिक वाढते, असे प्रतिपादन सीए चैतन्य वैद्य यांनी केले.

हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येथे सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटीआर- 9 व 9 सी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला सीए, करसल्लागर व त्यांचे कर्मचारी असे शंभरहून अधिक लोक उपस्थित होते. जीएसटीआर- 9 व 9 सी हे फॉर्म महत्त्वाचे व गुंतागुंतीचे असल्यामुळे त्यावरील सुस्पष्टता निर्माण करणे आवश्यक होते. सीए चैतन्य वैद्य यांनी व्यावहारिक उदाहरणे व सोप्या पद्धतींनी ही प्रक्रिया सहज प्रकारे समजावून दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये या होत्या. त्यांनी वक्त्यांच्या सादरीकरणाचे आणि सेमिनारच्या यशस्वितेचे कौतुक केले. उपस्थित सदस्यांनी सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत सेमिनार अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले. या वेळी सत्राध्यक्ष म्हणून सीए आनंद पंडित यांनी काम पाहिले व  मनोगतामध्ये सीए चैतन्य यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमावेळी शाखेचे उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, कमिटी सदस्य, सीए व कर सल्लागार उपस्थित होते. सीए कपिल लिमये यांनी सूत्रसंचालन केले.