Do or die for Delhi! The challenge of tough Chennai
चेन्नई : आयपीएलचा यंदाचा हंगाम चांगलाच रंगात आला असून प्ले ऑफ प्रवेशाच्या दिशेने कूच करत आहे. त्यामुळे आता होणारे सामने काही संघांसाठी ‘करो या मरो’ असेच असतील. बुधवारी चेन्नई सुपर किंग्जची दिल्ली कॅपिटल्सशी टक्कर होणार आहे. या मोसमात एकीकडे चेन्नई प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत सातत्याने पुढे जात असताना दिल्लीने या मोसमात ‘प्ले ऑफ’साठी पात्र ठरण्याच्या त्यांच्या आशांना जवळपास पूर्णविरामच लागला आहे. तरीही जर-तरच्या समीकरणावर अवलंबून राहायचे असल्यास दिल्लीच्या संघाला चेपॉक येथे चेन्नईला कोणत्याही किमतीत पराभूत करावे लागेल. मागील सामन्यात दिल्लीने आरसीबीच्या हातून विजय हिसकावून घेतला हे विसरता येणार नाही. हे पाहता दिल्लीला कमी लेखणे चेन्नईला महागात पडू शकते.
धोनीच्या नेतृत्वाखाली यलो आर्मीने शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले. त्याचवेळी दिल्लीनेही आरसीबीचा ७ विकेट राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्ज यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात दारूण पराभव पत्करल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने शानदार पुनरागमन केले. दुखापतीतून पुनरागमन करत दीपक चहरने गत सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याचवेळी तुषार देशपांडे आणि पाथिराना यांनीही धुमाकूळ घातला. फिरकीमध्ये रवींद्र जडेजा आणि महिष तिक्षाना ही जोडी फलंदाजांना अडचणीत आणण्यात यशस्वी ठरली आहे. चेन्नईच्या ताफ्यात तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, महिष तिक्षाना, रवींद्र जडेजा या गोलंदाजांचा समावेश आहे. ज्यांनी आपल्या गोलंदाजीने चांगलीच छाप पाडली आहे. त्यामुळे दिल्लीला सावध राहावे लागेल. फलंदाजीत ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी सीएसकेला दमदार सुरुवात करून देण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर शिवम दुबेनेही आपल्या झंझावाती फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. धोनी आणि जडेजाने खालच्या फळीत चांगलीच रंगत आणली आहे. मधल्या फळीत फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांचा पर्याय संघाकडे आहे. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या बॅटची ताकदही दाखवली आहे. सीएसकेच्या तळातील क्रमवारीत, एमएस धोनी आणि मोईन अली फिनिशिंग टच देण्यात ‘माही’र आहेत.












