२२०० कोटींचा पूर्व पूरनियंत्रण प्राथमिक आराखडा नागरिकांसाठी खुला करावा*

 

 

 

आ. शेखर निकम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नलावडा बंधारा कामाचा शुभारंभ

चिपळूण (प्रतिनिधी) : गेल्या पाच वर्षात चिपळूण शहर विकासासाठी कोट्यवधी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पुरनियंत्रणासाठी २१ कोटीच्या नलावडा बंधाऱ्यासह २२५ कोटीच्या संरक्षक भिंत प्रस्तावावर लवकरच निर्णय होईल. त्याचबरोबर पुर नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेला २२०० कोटींचा पुर्व प्राथमिक आराखडा येत्या दहा-पंधरा दिवसांत नागरीकांसाठी खुला करावा, अशा सुचना आमदार शेखर निकम यांनी सोमवारी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळयात ठप्प असलेल्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा आणि शहराला पुराचा धोका असलेल्या नलावडा बंधाऱ्याच्या ठिकाणी २१ कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ आमदार निकम यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

 

 

ते पुढे म्हणाले की, सन २००५ आणि त्यानंतर २०२१ ला महापूराने चिपळूण उध्वस्त केले. महापूरानंतर शहर परिसरातील पुर नियंत्रणासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात मला यश आले. गेल्या पाच वर्षात शहरासाठी ३५० कोटींचा निधी आणला. त्याचबरोबर नदी किनारा भागात संरक्षक भिंत उभारण्यासाठी २८५ कोटींचा प्रस्ताव शासनदरबारी गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यापर्यत चिपळूणचा प्रश्न पोहोचलेला आहे. त्यांनीही सकारात्मकता दर्शवलेली असल्याने सारे प्रश्न लवकरच सुटतील. शहरातील पुरनियंत्रणासाठी २०० कोटींचा शहराचा पुर्व प्राथमिक आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला आहे. तो आराखडा नेमका कसा आहे, त्यामध्ये काय समाविष्ठ आहे, अजून काय करता येईल याबाबत सुचना लेखी स्वरूपात जनतेने दिल्यास त्यावर विचार करून योग्य ती दुरूस्ती केली जाईल. यासाठी लवकरच तो आराखडा जलसंपदा विभागाने जनतेसाठी खुला करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

 

 

गेल्या पाच वर्षात चिपळूण शहरात तब्बल ३५० कोटींची विकासकामे होऊनही विधानसभा निवडणूकीत पिछाडीवर पडावे लागले, याचे शल्य आमदार शेखर निकम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्याना बोचत असताना सोमवारी झालेल्या कार्यक्रमात आमदार निकम यांनी हसत हसत आपली खंत बोलून दाखवली. २०१९ च्या निवडणुकीत शहरात काही काम केलेली नसतानाही शहराने मला आठ हजाराचे मताधिक्य दिले. तर आता कामे करूनही अडचण होतेय की काय असं मला वाटतयं. पण आता तो महत्वाचा विषय नाही. शहर आणि मतदारसंघ विकासाच्यादृष्टीने काम करत राहणं हे माझ्यादृष्टीने महत्वाचे आहे.

 

 

बचाव समिताच्यावतीने माजी नगरसेवक अरूण भोजने यांनी सांगीतले की, आजला नलावडा बंधाऱ्याचे काम होतंय हे चिपळूणच्यादृष्टीने फार महत्वाचे आहे. पुर नियंत्रणाच्यादृष्टीने आपण अर्धी लढाई जिंकली आहे. २००५ ला नलावडा बंधारा फुटल्यानंतर तो पुन्हा बांधण्यासाठी आजपर्यत कुणाला जे जमलं नाही ते आमदार निकम यांनी करून दाखवलं.

 

 

यावेळी जलसंपदाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, उपअभियंता विपूल खोत, अर्बन बँकेचे माजी संचालक उमेश काटकर, क्रेडाईचे राज्य सहसेकेटरी राजेश वाजे, शाहनवाज शाह नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे, शिवसेना तालूकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, माजी सभापती पुजा निकम, मिलींद कापडी, उदय ओतारी भाजपाचे आशिष खातू, विजय चितळे, विनोद भोबस्कर, आरपीआयचे प्रशांत मोहीते, उमेश सकपाळ, वालोपे माजी सरपंच रवींद्र तांबीटकर आदी उपस्थित होते.