राजापुरातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत निळकंठेश्वर देवरुख संघाची बाजी

राजापुरात कै.सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम विजेत्या निळकंठेश्वर देवरुख संघाला गौरविताना एड. जमिर खलिफे व मान्यवर
धूतपापेश्वर रत्नागिरी संघ ठरला उपविजेता
आंबेवाडीतील कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम

राजापूर | प्रतिनिधी : शहरातील आंबेवाडी येथील कै.सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत निळकंठेश्वर देवरुख संघाने धुतपापेश्वर रत्नागिरी संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. तर धूतपापेश्वर रत्नागिरी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.
प्रतिष्ठानचे हे या स्पर्धेचे नववे वर्ष आहे. कै.सुहास लोळगे स्मृती प्रित्यर्थ कै.सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही ५ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत या जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण जिल्हयातील २० संघानी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मित्रत्व गावखडी विरुद्ध निळकंठेश्वर देवरुख या दोन्ही संघांमध्ये अटीतटीच्या लढतीत निळकंठेश्वर देवरुख या संघाने शेवटच्या क्षणात सामना फिरवत एक गुणांनी विजय मिळवला तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धूतपापेश्वर रत्नागिरी विरुद्ध रत्नदीप मिरजोळे या दोन्ही संघांमध्ये झालेल्या थरारक लढतीमध्ये धुत पापेश्वर रत्नागिरी संघाने शेवटच्या एका मिनिटात सामना आपल्या बाजुने फिरवत एक गुणांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरी त प्रवेश केला.

त्यानंतर अंतिम सामना धूतपापेश्वर रत्नागिरी विरुद्ध निळकंठेश्वर देवरुख या दोन्ही संघांमध्ये रंगला आणि देवरुख संघाने धूतपापेश्वर रत्नागिरी संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला व चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक मित्रत्व गावखडी व चतुर्थ क्रमांक रत्नदीप मिरजोळे संघाला मिळाले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चढाई धूतपापेश्वर रत्नागिरीचा रोहित पाडावे याला तर उत्कृष्ट पकड देवरुख संघाचा श्रीदीप करंडे याला गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून देवरुख संघाचा ओंकार पातेरे याला गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी राजापूरचे माजी नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे, राजापूरच्या निवासी नायब तहसीलदार सौ. दिपाली पंडित, शिवस्वरूप कंट्रक्शनचे मालक संजय मेस्त्री, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बंडबे, सेक्रेटरी अविनाश लोळगे, नासिर मुजावर, सुबोध पवार, सुभाष रावण, दत्ताराम गार्डी आदी मान्यवर उपस्थित होते. या तीन दिवस सुरू असलेल्या स्पर्धे प्रसंगी राजापूर शहर व तालुका परिसरातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला हजेरी लावली व मंडळाला शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेला राजापूर तालुका कबड्डी असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सर्व पंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बंडबे, सेक्रेटरी अविनाश लोळगे, महेश बंडबे, भूषण गाडी, निलेश नवाळे, देवेंद्र गार्डी, राकेश कातकर, सागर आंबिलकर, सुरज जड्यार, विशाल बडबे, संतोष कोळेकर, दिनेश नवाले आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. अत्यंत सुयोग्य असे नियोजन करून मंडळाने या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या. या स्पर्धा पहाण्यासाठी कबड्डी प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेचे समालोचन निखिल भारतू यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन देवेंद्र गार्डी यांनी केले.