रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरानजीक मिरजोळे-जांभुळफाटा येथील चायनिज सेंटरवर मारहाण व सेंटरची तोडफोड केल्या प्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.ही घटना गुरुवार 11 मे रोजी रात्री 10 वा. सुमारास घडली आहे. सर्वेश पाटील व साहिल पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादीनुसार, भक्ती ज्ञानदेव पावसकर यांचे मिरजोळे-जांभुळफाटा येथे चायनिज सेंटर आहे. रात्री फिर्यादी हे सेन्टर बंद करत असताना दोघे संशयित आले. सेंटरमधील कुक हा पुर्वी संशयित सर्वेश पाटील याच्याकडे कुक म्हणून कामाला होता. पंधरा दिवसांपुर्वी त्याने गावी जायचे आहे असे सांगून काम सोडलेले होते. याचा राग मनात धरुन सर्वेश पाटील व साहिल पाटील यांनी त्या कुकला लाथाबुक्यांनी मारहाण करायला सुरवात केली. तर साहिलने त्याच्या हातातील कोणत्यातरी धारदार वस्तूने फिर्यादी यांच्या डोक्यात मारले. फिर्यादी यांच्या सोबत असलेले साक्षीदार वेदांत पावसकर भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला आला असता त्याला देखील लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांना तुला बघून घेईन मारुन टाकीन अशी धमकी देवून चायनिज सेंटरमधील वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरोधात भादंवि कायदा कलम 324,504,506,34,427 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास शहर पोलिस करत आहेत