महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत उत्कर्षम् महोत्सव उत्साहात

तृतीय वर्ष बीसीएने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांत उत्कर्षम् महोत्सवाची शनिवारी उत्साहात सांगता झाली. ६ ते ११ जानेवारीदरम्यान, विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांनी महोत्सव रंगतदार झाला. शनिवारी दुपारी लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, व्याख्याते, शिक्षक माधव अंकलगे आणि प्रकल्पाचे प्रमुख मंदार सावंतदेसाई आदींच्या हस्ते बक्षीस वितरणाने उत्कर्षमची सांगता झाली.

मंचावर लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, व्याख्याते माधव अंकलगे, संस्थेचे प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, कार्यकारी मंडळ सदस्य शिल्पा पानवलकर, प्रसन्न दामले, बीसीएच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, नर्सिंगच्या प्र. प्राचार्य समिना मुलाणी उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. कॉलेजमधील वार्षिक कार्यक्रमांचा आढावा स्नेहा कोतवडेकर, समिना मुलाणी व स्वरा साखळकर-जोशी यांनी घेतला. मान्यवरांचा सत्कार मंदार सावंतदेसाई यांनी पुष्परोपटे, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन केला.

आपल्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी रक्ताचे पाणी केले आहे, याची जाणीव ठेवा. त्यामुळे कधीही मर्यादा ओलांडू नका. देशाच्या पिढीचे भवितव्य तुमच्या हातात आहे. मोबाईलपासून दूर राहा. आज तुम्हाला मिळालेले पदक तुम्ही आई-वडिलांना द्या, त्यांना खूप आनंद होईल. नोकरी, व्यवसाय करताना समाजासाठी देणे लागतो, हे ध्यानात ठेवा, असे प्रतिपादन व्याख्याते माधव अंकलगे यांनी केले. त्यांनी अतिशय सुरेख शब्दांत मार्गदर्शन केले.

गणेश धुरी म्हणाले, देशात महिला शक्तीचे महत्त्व अधिक आहे. आपण महर्षी कर्वे संस्थचे व रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करावे. अध्यक्षीय भाषणात मंदार सावंतदेसाई यांनी सांगितले की, महर्षी कर्वे संस्थेच्या या कॉलेज कॅंपसमधून विद्यार्थिनी चांगले संस्कार घेऊन जाणार आहेत. काही नवीन कोर्सेस येथे चालू आणि प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इशा दामले व वेदिका मेस्त्री या विद्यार्थिनींनी केले. प्रा. गौरी भाटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. प्रतिभा लोंढे यांनी बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन केले. प्रा. श्रुती यादव यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान
क्रीडा स्पर्धा आणि उत्कर्षम् महोत्सवातील विविध स्पर्धांतील विजेत्यांना गौरवण्यात आले. सर्वसाधारण विजेतेपद तृतीय वर्ष बीसीएला देण्यात आले. मिस उत्कर्षमचा किताब इफ्रा जमादार हिला मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून सृष्टी विचारे (तृतीय वर्षे बीसीए), लता राऊत (टेक्स्टाईल व फॅशन डिझायनिंग डिप्लोमा), वृषाली रावणंग (नर्सिंग) यांना सन्मानित केले. आविष्कार स्पर्धेतील विजेती मंजिरी कांबळे हिला सन्मानित केले. तसेच रोटरी क्लबतर्फे देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार मिलिंद तेंडुलकर यांना मिळाला. त्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सत्कार केला.