मोटरसायकल अपघातात जामसंडे सोहनीवाडी येथील युवकाचा मृत्यू

इळये-कुणकेश्वर मार्गावर, कुणकेश्वर हायस्कूलजवळ अपघात

देवगड l प्रतिनिधी :इळये-कुणकेश्वर मार्गे देवगडकडे जात असताना मोटरसायकलवरील ताबा सुटून गाडी स्लीप होऊन झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रूपेश नंदकुमार कदम (वय ४२, रा. जामसंडे सोहनीवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात १३ जानेवारी रोजी दुपारी १.१५ वाजता इळये-कुणकेश्वर मार्गावर, कुणकेश्वर हायस्कूलजवळ घडला.

 

अपघाताची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश कदम हे कुणकेश्वर वाळकेवाडी येथील अजित दिगंबर वाळके यांच्या कडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. सोमवारी दुपारी त्यांनी मालकांना “मी बँकेत जातो,” असे सांगून मोटरसायकलने बाहेर पडले. इळये-कुणकेश्वर मार्गे देवगडकडे जात असताना त्यांच्या मोटरसायकलवरील ताबा सुटून गाडी स्लीप झाली, व अपघातात ते रस्त्यावर पडले.

 

त्या वेळी, कुणकेश्वर येथे जाणाऱ्या एका पर्यटकाच्या निदर्शनास रस्त्यावर पडलेली व्यक्ती आली. त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिक, कुणकेश्वर हायस्कूलचे शिक्षक व कर्मचारी यांना माहिती दिली. सर्वांनी धावाधाव करत रूपेश कदम यांना देवगड येथील सरिता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

रूपेश कदम हे जामसंडे सोहनीवाडी येथे राहत होते. त्यांच्या निधनामुळे देवगड किल्ला, कुणकेश्वर व सोहनीवाडी येथील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या मागे वडील, पत्नी रश्मी, सात वर्षांची मुलगी, दोन भाऊ, एक बहिण व भावजया असा परिवार आहे.

 

अपघाताची तक्रार मयत रूपेश कदम यांचे बंधू प्रकाश नंदकुमार कदम यांनी देवगड पोलीस स्थानकात नोंदवली आहे. या प्रकरणाचा तपास एएसआय राजन जाधव करत आहेत.

 

रूपेश कदम यांच्या दुर्दैवी मृत्यूने देवगड परिसरात शोककळा पसरली आहे.