कणकवली I संतोष राऊळ : शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी जीवनात खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळामुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात.खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो ,तर अशाच प्रकारे फक्त अभ्यासातच नव्हे तर विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडवण्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली येथे अत्यंत दिमाखात व जोश पूर्ण वातावरणात क्रिडा महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांद्वारे विविध ड्रिल्सचे सादरीकरण करण्यात आले जे विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे होते. यामध्ये ‘एक्वा हाऊस द्वारे -बेटी बचाओ,बेटी पढाओ’ टेरा हाऊस द्वारे -पृथ्वी वाचवा ,वेन्टस हाऊस द्वारे -जीवनातील खेळांचे महत्व आणि इग्निस हाऊस द्वारे- जीवनातील खिलाडू वृत्तीचे महत्त्व या विविध प्रकारचे संदेश देत प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यानीदेखील व्यायामाचे महत्त्व सांगत ड्रिलचे सादरीकरण केले .त्याचबरोबर पहिली पासून ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये भाग घेत अनेकविध पदके व ट्रॉफींची प्राप्ती केली.
Celebrating ‘Sports Festival’ in Podar International School.
या महोत्सवासाठी विद्यार्थ्यांद्वारे मशाल प्रज्वलित करून व गायन व नृत्याद्वारे प्रेक्षकांच्या उत्साहात भर टाकण्यात आली. प्रस्तुत महोत्सवासाठी वेटलिफ्टिंग व बॉडीबिल्डिंग खेळात राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त असणाऱ्या, तसेच सन 2001 च्या महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या श्रीमती विद्या रोहिदास शिरस या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. ज्या सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी आपल्या जीवनातील खेळाचे महत्व सांगत अशाच प्रकारे खिलाडू वृत्ती जतन करण्याचा संदेश सर्व विद्यार्थ्यांना दिला.त्याचबरोबर शाळेच्या प्राचार्या सौ.स्वाती कणसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून खेळामुळे आपणांस होणारे फायदे सांगितले व अभ्यासासोबतच भविष्यात खेळाचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.सोबतच उपस्थित प्रेक्षक व पालक वर्ग यांनी देखील अशा अद्भुत व नयनरम्य महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल प्राचार्या सौ.स्वाती कणसे व शिक्षक वर्ग यांचे अभिनंदन केले.