मळगांव हायस्कूल येथे पोषण आहार बनविणाऱ्या महिलांकरिता प्रशिक्षण

बाल रक्षा भारत संस्था संचलित ‘ईट राईट स्कूल’ प्रकल्पांतर्गत आयोजन 

सावंतवाडी । प्रतिनिधी : बाल रक्षा भारत संस्था संचलित ‘ईट राईट स्कूल’ प्रकल्प सिंधुदुर्ग आयोजित पोषण आहार बनविणाऱ्या महिलांकरिता एकदिवसीय प्रशिक्षणवर्ग कार्यक्रम रविवारी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत पार पडला.

प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर बाळ रक्षा भारत संस्थेचे प्रकल्प समन्वयक किरण थोरात, शशिकांत सातार्डेकर, प्रशालेच्या शिक्षिका नेहा गोसावी, शैलजा परुळकर, विद्या विकास हायस्कूल आरोसचे मुख्याध्यापक शिरीष नाईक, दिल्लीच्या (एफएसएसएआय) प्रशिक्षण म्हणून लाभलेल्या अपर्णा गुप्ता, आकाश मणचेकर, मनीषा खणगावकर, विकी केरकर, रोहन शारबिद्रे, फ्रेन्सिना लूद्रिक, प्रशालेचे कर्मचारी रितेश राऊळ, दाजी राऊळ आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या भारतीय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरण (फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत सुरक्षित अन्न व निरोगी आहाराची उपलब्धता आणि वापर सुनिश्चित करून अन्नसुरक्षा व पोषण बदलासाठी अनेक उपक्रमांपैकी एक जागतिक स्तरावरील मोंडेलिझ या कंपनीच्या अर्थसहाय्याने मुंबई शहर व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘ईट राईट स्कूल’ उपक्रम सावंतवाडी तालुक्यातील एकूण ६५ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.

या प्रशिक्षण वर्गात अन्नसुरक्षा आणि स्वच्छता, परिसर स्वच्छता कचऱ्याची विल्हेवाट आणि व्यवस्थापन, कृषीधन आणि पाण्यातून होणाऱ्या विषबाधेपासून प्रतिबंध कसा करावा, अन्न आणि पाणी सुरक्षित संदेश, वैयक्तिक स्वच्छता आदी विषयांवर सविस्तररित्या प्रशिक्षण देण्यात आले, या प्रशिक्षणाला ४६ महिला उपस्थित होत्या.

प्रशालेचे कर्मचारी रितेश राऊळ आणि दाजी राऊळ यांचे त्यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या योगदानासाठी गुलाबपुष्प देऊन विशेष कौतुक करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सातारकर यांनी तर आभार फ्रेन्सिना लुद्रिक यांनी मानले.