आकांक्षा पुढती जिथे गगन ठेगणे..

इंडियन एअर फोर्स मध्ये पायलट बनण्याचे स्वप्न

शिळ गावातील पार्थ गोंडाळची एनडीए प्रशिक्षणासाठी निवड

संतोष मोंडे l राजापूर: असाध्य तें साध्य करितां सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या ओवीप्रमाणे तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी, मनात जिद्द आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगल्यास असाध्य ते साध्य करण्याची किमया साधता येते, हे कु. पार्थ अरविंद गोंडाळ या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याने सार्थ करून दाखविले आहे.

राजापूर शहरानजीकच्या शिळ गावचा रहिवासी असलेल्या मुंबईस्थीत पार्थने ‘एनडीए’ मध्ये करिअर करण्याचे स्वप्न मनी बाळगले आहे. त्याला अथक परिश्रम आणि अभ्यासाची जोड देत इंडियन एअरफोर्समध्ये पायलट बनण्याचे दृष्टीने पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला असून त्याची राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) १५३ व्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तो राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासला पुणे येथे पुढील प्रशिक्षणासाठी रूजू झाला आहे.

पार्थचे वडिल अरविंद राजाराम गोंडाळ हे तारापूर अणुउर्जा केंद्रात टेक्नीशियन आहेत. त्यामुळे त्याचे पहिली ते अकरावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण निवासी कॉलनीमध्ये आण्विक ऊर्जा शिक्षण संस्थे (एईईएस) अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यालयात झाले आहे. दहावी परीक्षा पार्थ ने २०२२ मध्ये ९३% गुणांनी उत्तीर्ण केली आहे. तर बारावी परीक्षा त्याने मार्च २०२४ मध्ये बोईसर मधीलच यु. एस. ओसवाल इंग्लिश अकॅडमी मध्ये मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांसह ९१ % गुणांसह उत्तीर्ण केली आहे.

सध्या मेडीकल, इंजिनिअरींग आय.टी. मध्ये करिअर करण्याचा विद्यार्थ्यांचा ट्रेड आहे. मात्र पार्थ ने जीवनात काही तरी इतरांपेक्षा वेगळं आणि साहसी करण्याचा निश्चय केला होता. जसं जसं त्याला समजू उमजू लागलं तसे त्याने भारतीय सैन्य दलात करिअर करण्याचे ध्येय निश्चित केले. दरम्यान त्याने १९९९ च्या कारगिल युद्धातील आधारीत ऋ तीक रोशनच अभिनीत ‘लक्ष्य’ सिनेमा पाहिला आणि आपण सैन्यदलात एअरफोर्समध्येच करिअर करायचे हे ठरवून टाकले. मात्र हे सहज शक्य नाही याची जाणीव त्याला होती.

बारावी नंतर हवाई दलात सामील होण्यासाठी युपीएससी द्वारे एन. डी. ए. इंटरन्स परीक्षा होत असते. देशातील प्रशासन सेवेतील ही अत्यंत खडतर परिक्षा असते. जिथे तुमच्या बुध्दीचा कस लावावा लागतो. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. प्रत्येक वेळी जवळपास ४ ते ६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. जीवनात यशस्वी वाटचाल करण्याच्या उद्देशाने जगत असताना अनेक गोष्टी त्या सहजा सहजी प्राप्त होत नाही. त्या मिळविण्याकरिता अर्थात हेतू साध्य करण्याकरिता खूप कष्ट उपसावे लागतात. कष्ट करण्याची मानसिकता असावयास पाहिजे. याची जाणीव पार्थ ला होती. पार्थ ने या परीक्षेबाबत इंटरनेटवर माहिती मिळवून स्वत:चा अभ्यास स्वत: केला. खासगी क्लासेसमध्ये लाखो रूपयांची फी देवून या परीक्षेची विद्यार्थी तयारी करतात. मात्र पार्थ ने इंटरनेटचा सुयोग्य वापर करून या खडतर परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळविले. पार्थ च्या वेळी ८ लाख ५२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेतून निवडक विद्यार्थी निवडले जातात. पार्थ या परिक्षेत संपूर्ण भारतातून ४१८ रैंक मध्ये उत्तीर्ण झाला. त्यातून पुढे प्रत्यक्ष मुलाखत, वैद्यकीय चाचणी, शारिरिक चाचणी परिक्षा होवून त्यातून एनडीए प्रशिक्षणासाठी निवडले जाते. इंटरन्स परीक्षेपासून प्रत्यक्ष एनडीए प्रवेश मिळेपर्यंत आठ ते दहा महिन्यांचा कालावधी हा बुद्धिमत्ता, गुणवत्ता, क्षमता आणि सर्जनशीलता यांची परीक्षा घेणारा असतो. मात्र पार्थ ने या साऱ्या खडतर प्रवाशातून आपली क्षमता सिध्द केली असून आपल्या लक्ष्याकडे आगेकुच केली आहे. पार्थला फुटबॉलची आवड असून एअरफोर्स टीमचा कप्तान बनण्याचेही त्याचे स्वप्न आहे.

एअरफोर्स पायलट बनण्यासाठी एनडीए अंतर्गत तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. यानंतर, हवाई दलाच्या कोणत्याही स्टेशनवर एक वर्षाचे प्रशिक्षण कालावधीनंतर कायमस्वरूपी आयएएफ अधिकारी म्हणून नियुक्ती होते. मनाशी बाळगलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी पार्थ नुकताच राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासला पुणे येथे रूजू झाला आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

केवळ स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात उतरविणे ही गोष्ट सहज साध्य नसते. त्याकरिता खूप कष्ट उपसावे लागतात. कष्ट करण्याची मानसिकता मनात बाणवावी लागते त्यातूनच् निश्चित लक्ष्य साध्य करता येते हे पार्थ ने दाखवून दिले आहे. पार्थ ला त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!