अनेक जण गंभीर जखमी
मंडणगड | प्रतिनिधी : तालुक्यातील लाटवण आदीवासीवाडी येथील आदीवासी समाज बांधवांची कुटुंबे पाली येथे देव दर्शनाकरिता गेलेले असताना परतीच्या प्रवासात त्याची झायलो ही गाडीस झाडावर आदळल्याने महाड तालुक्यातील कोंड मालुसरे या ठिकाणी गंभीर अपघात झाला. या अपघातात एक वयस्कर महिला मयत झाली त्याचबरोबर या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याने घोगरेकर, जगताप व पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली.
हा अपघात 14 मे 2023 रोजी 11.30 वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील कोंड मालुसरे गावानजीक झाला. या अपघातात लक्ष्मी धाकट्या घोगरेकर वय (75) राहणार लाटवण आदीवासीवाडी यांचे घटनास्थळीच निधन झाले तर गाडीतील अनिता संतोष घोगरेकर वय (40), अर्चना गोपाल जगताप वय (26), सुमीत संतोष घोगरेकर वय (14) पुर्वा संतोष घोगरेकर वय (12) सुमेध संदीप घोगरेकर वय (1.5 वर्ष), संतोष धाकट्या घोगरेकर वय (40) सर्व राहणार लाटवण आदीवासी वाडी हे गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर वनिता संतोष घोगरेकर वय (40) सुरज गणेश पवार वय (25) आर्यन संदीप घोगरेकर वय (15) सर्व राहणार लाटवण आदीवासीवाडी यांना किरकोळ दुःखापत झाली आहे. या घटनेसंदर्भात मंगला गणेश पवार वय (35) राहणार आदीवाडी लाटवण तालुका मंडणगड यांनी दिलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने नातेवाईक व पाहूणेमंडळी सुट्टीसाठी आलेले असल्याने घरातील सर्व नातलग मुलेबाळे व वाडीवर राहत असलेले भावांची कुटुंबे एरटीगा व झायलो या दोन गाड्यामधून देवदर्शनाकरिता रायगड जिल्ह्यातील पाली येथे गेले होते देवदर्शनाचा कार्यक्रम आटपून सर्वजण रात्री घराकडे परतत असताना घरापासून काही मीटर अंतरावरती आलेले असताना झायलो गाडीच्या चालकाचा गाडीवरुन ताबा सुटुन गाडी रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर आदळल्याने अपघात झाल्याची माहीती फिर्यादीत नमुद केली आहे.
अपघातात जखमींवर मंडणगड येथील ग्रामिण रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचाराकरिता डेरवण येथे पाठविण्यात आले व डेरवण येथूनही पुढील उपचाराकरिता मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहीती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. मंडणगड पोलीस स्थानकात या घटनेसंदर्भात जवाब दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.