“A resounding victory in the Jamkhandi assembly constituency will strengthen the historic ties between Jamkhandi-Ratnagiri.”
मा. आमदार बाळ माने यांची प्रतिक्रिया
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही कार्यकर्त्यांचा दृढ निश्चय किती प्रभावी ठरू शकतो हे दर्शवणारा जमखंडी विधानसभेचा निकाल खरोखर ऐतिहासिक आणि संस्मरणीय आहे. भाजपा उमेदवार नाडोज (दानशूर) जगदीश गुडगुंटी यांनी अतिशय धैर्याने आणि संयमाने हा विजय खेचून आणला आहे. लोकांनी मतदान करताना पक्ष, विचारधारा, कार्यकर्त्यांची तळमळ आणि नेत्याची कार्यप्रवणता या गोष्टींना डोळ्यांसमोर ठेऊन मतदान केले. त्यामुळे या विजयाचे श्रेय देण्याची वेळ आलीच तर ते उपरोक्त चार प्रवाहांना देता येईल असे माझे ठाम मत आहे.
सन २०१३ व सन २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात विजयाने हुलकावणी दिली होती. आज मात्र गेल्या दहा वर्षांची कसर भरून काढण्यात भाजपा कार्यकर्त्यांना अभूतपूर्व यश आले आहे. कर्नाटकातील जनतेने संपूर्ण राज्यात दिलेला कौल भाजपासाठी धक्कादायक असल्याचे मान्य केले तरीही भाजपा कार्यकर्ते आणि नेते राष्ट्रीय मुद्दे घेऊन जनतेसमोर गेले होते. ‘राष्ट्र प्रथम’ विचारसरणी असलेल्या भाजपाने प्रसंगी पराभव स्वीकारला पण राष्ट्रीय मुद्द्यांना आणि विशेषकरून हिंदुत्त्वाला तडा जाऊ दिला नाही ही बाब उल्लेखनीय आहे. बाकी मुद्दे भाजपाच्या चिंतन शिबिरात येतीलच पण तरीही जनतेचा कौल नम्रपणे भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्त्वाने स्विकारला आहे.
जमखंडी विधानसभा क्षेत्राची संरचना आणि जनमानस लक्षात घेऊन या ठिकाणी प्रचार करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय समितीने माझी निवड केली. विविध जातींमध्ये विभागलेल्या लोकांना भाजपाची भूमिका आणि विकासात्मक दृष्टीकोन समजावून सांगणे व भाजपा उमेदवार श्री. जगदीशजी गुडगुंटी यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे ही जबाबदारी माझ्यावर होती. तिथे जाण्यापूर्वी थोडा गृहपाठ करूनच गेलो होतो. या ठिकाणी जातींचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. सर्वच प्रमुख जातींचे मतदान थोड्याफार फरकाने सारखेच आहे. त्यामुळे याठिकाणी विजयासाठी कार्यकर्त्यांना खूप मोठी कसरत करावी लागते. सर्वाधिक मतदान मराठा व मुस्लीम समाजांचे असून जवळपास प्रत्येकी ३५००० आहे. त्याखालोखाल लिंगायत व SC समाजाचे मतदान आहे. ते ही जवळपास प्रत्येकी २५००० आहे. यात लिंगायत समाजात तेली आणि पंचमशाली अशा दोन उपजाती आहेत. वक्कलिंग समाजाचे २२००० तर धनगर समाजाचेही २०-२२००० मतदान असल्याने कोणी एका समाजाचे याठिकाणी वर्चस्व पहायला मिळत नाही.
एकूण २ लाख २० हजार मतदान असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तेली समाजातून येत असल्याने जवळपास १५००० मते थेट त्यांच्या खात्यात जातात. मुस्लीम मतेसुद्धा काँग्रेसच्या खात्यात जात असल्याने ५०००० मतांचा आकडा गाठण्यात काँग्रेसला कोणतीही अडचण येत नाही. मराठा समाजातील अनुभवी, ज्येष्ठ लोक आजही काँग्रेससोबत होते. मात्र यावेळी याच लोकांनी अक्षरशः खेळ पालटला. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही रणनिती तयार केली आणि शेवटचे आठ दिवस त्यावर झोकून काम केले. पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी फोनद्वारे आणि गाठीभेटी घेत बैठका ठरवल्या. आणि आम्ही सर्व ठरलेल्या वेळांमध्ये त्या त्या ठिकाणी जाऊन लोकांचे प्रबोधन केले. यावेळी धनगर समाजानेही आम्हाला मोठे सहकार्य केले. त्यामुळे एकवेळ आम्ही आमचे उमेदवार २०००० पेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आणू शकू अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
गुडगुंटी साहेब एक प्रतिष्ठित व्यक्ती असण्यासोबतच अत्यंत दानशूर आणि स्वच्छ चारित्र्याचे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांना जपणारा नेता अशीही त्यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे. माझ्यासोबत देण्यात आलेले सर्वच कार्यकर्ते अत्यंत उत्साही, हरहुन्नरी आणि नेतृत्त्वासाठी झटणारे होते. त्यामुळे आम्ही संपूर्ण वेळेचा सदुपयोग करण्यावर भर दिला. युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार, पराक्रम आणि विकासात्मक दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला. सोबतच सुभेदार तानाजी मालुसरे, सरनोबत नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. त्यांच्या मनाला हा प्रयत्न नक्कीच भावला. हे मी ठामपणे सांगत आहे याचे महत्त्वाचे कारण असे की आम्ही त्या त्या ठिकाणांहून गेल्यानंतर तिथे कार्यउभारणी याच तरुणांनी केली. आणि अशा प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार आघाडीवर असल्याचे आम्हाला पहायला मिळाले. निकालाच्या दिवशी मी रत्नागिरीत असलो तरीही फोनद्वारे सतत आढावा घेत होतो.
२००८ ते २०१३ या कालावधीत जमखंडी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्त्व करणारे भाजपाचे मा. आमदार श्री. श्रीकांत कुलकर्णी यांनीही आपल्या संघटन कौशल्याने मतदारांना प्रभावित केले. ७० – ७२ च्या घरात असलेले श्रीकांतदादा या वयातही त्याच तडफेने आणि उत्साहाने कार्यरत असलेले पाहून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत ते उसंत न घेता लोकांमध्ये वावरत होते. केवळ इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण समर्पित स्वयंसेवक या मतदारसंघात कार्यरत ठेवले होते. श्री. नंदकुमार गायकवाड यांनी मतदारसंघात प्रभारी म्हणून मिळालेल्या भूमिकेस योग्य न्याय देत प्रचारात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. अत्यंत नियोजनबद्ध रीतीने कार्यक्रमांची आखणी केल्याने कार्यकर्त्यांचा वेळ वाचला आणि विजय सुकर झाला.
भाजपा नेते आणि मराठा समाजाचा प्रमुख चेहरा असलेले मा. मोहन जाधव साहेब यांचेही योगदान उल्लेखनीय आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे नाकारले असले तरी मोहनजी नाराज झाले नाहीत. त्यांनी पक्षासाठी सर्वोच्च योगदान देत कार्यकर्ता कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. अनेक ठिकाणी मराठा समाजातील ज्येष्ठ काँग्रेससोबत असल्याचे पहायला मिळाले. मात्र त्यांच्या घरातील युवकांनी आणि महिलांनी मोदी साहेबांवर विश्वास दाखवला मागील दहा वर्षांत जे झाले नाही ते यावेळी घडवून आणण्यात या वर्गाचेही योगदान कौतुकास पात्र आहे.
एकूण २१ लोक या मतदारसंघातून आमदार होण्यासाठी इच्छुक होते. मात्र भारतीय जनता पक्षाने श्री. जगदीश गुडगुंटी यांचे नाव जाहीर केल्यानंतर १९ इच्छुकांनी पक्षादेश मान्य केला. या सर्वांनी एकदिलाने पक्ष म्हणून श्री. गुडगुंटी यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. प्रचार मोहिमेत सर्वांनी दिलेले दायित्त्व योग्य रीतीने पार पाडले. स्वार्थ आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेऊन पक्षाच्या विचारसरणीचा पुरस्कार केला. त्यामुळे भाजपाच्या यशात या सर्वांच्या त्यागाचे महत्त्व अनमोल आहे असे मी समजतो.
शेवटच्या आठ दिवसांत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून पूर्ण मतदारसंघात वादळी प्रवास केला. स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खेडोपाडी जाऊन आम्ही सभा घेतल्या. लोकांना सकारात्मक दृष्टीकोन देत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाचा प्रवाह मतदारसंघात आणण्यासाठी सहयोग करावा अशी गळ घातली. मात्र हे करत असताना मी, स्वतः गुडगुंटीजी, मोहनजी किंवा आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याने विरोधी उमेदवारावर कोणतीही व्यक्तिगत टीका करण्याचे प्रकर्षाने टाळले. मात्र काँग्रेसवर सडकून टीका केली जो निवडणुकीच्या प्रचारातील एक राजकीय भाग होता.
जमखंडी हा मराठी भाषिकांचा भाग आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात या ठिकाणी अस्तित्त्वात असणारे पटवर्धन सरकार तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेलांच्या मध्यस्थीने भारतात विलीन झाले. अजूनही या पटवर्धन सरकारांचा राजवाडा आपल्याला पहायला मिळतो. याच पटवर्धनांचे वंशज आजही आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत. केंद्रीय नेतृत्त्वाने जमखंडी विधानसभेतील मराठा मतदारांना भाजपाकडे वळवण्याचे दायित्त्व माझ्यावर सोपवले आणि त्यानंतर आलेल्या विजयाने मी समाधानी आहे. या संपूर्ण अभियानात सतत माझ्यासोबत असणारे माझे सहकारी लांजा तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. विजयराव कुरूप, चिपळूण शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम शिंदे, कळकवणे दसपटीचे श्री. सुधीर शिंदे, रत्नागिरी कोकणनगर मध्ये रहाणारे आमचे रामकू ऊर्फ रामचंद्र कदम यांनीही आपापले योगदान देत पक्षाचा प्रचार केला त्यामुळे या यशात त्यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. काही कारणाने सरकार आणण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मान्य करावे लागेल; कारण हा जनतेचा कौल आहे आणि आम्ही लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते आहोत. या विजयामुळे केवळ माझ्याशीच नव्हे तर पूर्ण रत्नागिरीशी असणारे जमखंडीचे नाते वृद्धिंगत झाले आहे.