Leaning on the merry-go-round of memories, met the ‘old’ friends at the ‘new’ turn
मळगांव इंग्लिश स्कूलच्या एस.एस.सी.८८-८९ चा ‘स्नेहमेळावा ‘ ठरला यादगार
विविध गुणदर्शन कार्यक्रम मनोगतं व जुन्या आठवणींना उजाळा
नृत्य गायन खेळ व धमाल मस्ती यातून अनुभवल्या शालेय स्मृती
सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवमधील एस. एस. सी. गृप १९८८ – ८९ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा “स्नेह मेळावा” रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी सादर केलेले विविध गुणदर्शन कार्यक्रम, मनोगते यामुळे जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. धमाल मस्ती, खेळ, चुटकुले, मनोरंजनाचे कार्यक्रम, नृत्य, गीत गायन यांसह जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत हा ‘ स्नेह मेळावा ‘ यादगार ठरला.रेडी येथील गणपतीच्या दर्शनानंतर शिरोडा वेळागर येथील ‘ हॉटेल सनशाईन ‘ या अत्यंत रमणीय व निसर्गरम्य तसेच ‘बिच रिसॉर्ट ‘ म्हणून प्रख्यात असलेल्या रिसॉर्टवर संपन्न झालेल्या या मेळाव्यात गृप मधील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी आपल्या मनोगतांमधून आपली ओळख देतानाच वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सद्यस्थितीत सर्वजण कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत याचाही आढावा घेतला.
सर्वांनीच आपलं वाढतं वय विसरून सहकारी मित्रांसोबत पून्हा एकदा तरुण बनून धमाल केली. आपापल्या आयुष्यातील व करिअर मधील चढ उतार यांचे अनुभव कथन करीत सर्वांचीच मने मोकळी झाली व पूढील आयुष्यासाठी नवी चेतना प्राप्त झाल्याचा भास झाला.एस. एस. सी. नंतर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी- व्यवसायांनिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी व विद्यार्थीनी तब्बल ३३ वर्षानंतर गतवर्षी स्नेह मेळाव्यात एकत्र आले होते. त्यानंतर यावर्षी पून्हा एकदा सर्वजण मिळून स्नेहाचा व मैत्रीचा सोहळा संपन्न झाला. मळगांव सहीत वेत्ये, नेमळे, निरवडे, सोनुर्ली या गावांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग असलेला हा मेळावा सर्व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या नियोजनबद्ध संयोजना द्वारे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यात महेश खानोलकर, संतोष शिरोडकर, पत्रकार सचिन रेडकर, प्रा. श्याम सोनुर्लेकर, प्रा. उदय सावळ, तुळसीदास नाईक, सतीश राऊळ, उदय फेंद्रे, प्रमोद गवंडे, अंकुश गांवकर, दिगंबर नाईक, प्रताप राऊळ, सुचित मोर्ये, राजन गावडे, कृष्णा गांवकर, प्रदीप सोनुर्लेकर, संतोष नेमळेकर, रामा कोळेकर, एकनाथ नाटेकर तसेच दर्शना खानोलकर, गीता ठाकूर, मंगल खडपकर, सुवर्णा गांवकर, मीना पेडणेकर, माधवी सावळ, प्रतिभा राणे, चारुलता महाले, कांचन धुरी, निता राणे, कमल राऊळ, मंदा तळकटकर, नभा गाड, संगिता कुडतरकर, प्रतिभा वाळके, तृप्ती डिचोलकर, अनिता तुळसकर आदी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थीनींनी कराओकेच्या धूनवर विविध गाणी गायली. यात अभंग, चित्रपट गीते ते बाल गितेही सादर करण्यात आली. तर स्पर्धात्मक सहभाग घेत डॉल्बीच्या तालावर धमाल नृत्येही सादर केली. यात अगदी ‘ससा तो ससा ‘ या बाल नृत्या बरोबरच कोळी गिते, रॅकॉर्ड डान्स व शेवटी सैराटच्या तूफान गाण्यावर सर्वच उपस्थित मित्र मैत्रीणींनी नृत्याचा आस्वाद घेतला. सह भोजन व त्यानंतर शिरोडा वेळागराच्या रुपेरी किनार्यावरील चंदेरी वाळूत विविध खेळ खेळत समुद्र स्नानाचाही आनंद घेतला. एकूणच धमाल मस्ती, खेळ, नृत्य, गीत गायन व आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत हा ‘ स्नेह मेळावा ‘ यादगार ठरला. शेवटी पूढील वर्षी २८ जानेवारी रोजी अशाच प्रकारे एकत्र येण्याचा संकल्प करीत दिवसभराच्या आठवणी मनात साठवत सर्वांनी तात्पुरता निरोप घेतला.
चौकट
प्रहारचे पत्रकार सचिन रेडकर व महिला पोलीस माधवी सावळ यांचा सत्कार
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यावेळी बॅचमधील सहकाऱ्यांच्या माध्यमातून दैनिक प्रहारचे पत्रकार तथा या ग्रुपचे सदस्य सचिन रेडकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या माधवी सावळ – राणे या सहकारी मैत्रिणीलाही यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मित्र-मैत्रिणींबरोबरच दैनिक नवप्रभाचे पणजी येथील पत्रकार प्रमोद ठाकूर उपस्थित होते. यावेळी सचिन रेडकर माधवी सावळ यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या कार्याचा आढावा घेतला. तर प्रमोद ठाकूर व प्रा. उदय सावळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.