आषाढी एकादशीनिमित्त ५००० विशेष एसटी गाड्या सोडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Chief Minister’s instructions to release 5000 special ST trains on the occasion of Ashadhi Ekadashi

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर आषाढी यात्रेसाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल होत असतात. यंदा या वारकर्‍यांसाठी राज्यभरातून ५००० विशेष एसटी गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. २५ जुलै ते ५ जूनपर्यंत या विशेष गाड्या धावणार आहेत.

याचबरोबर वाखरी येथे होणा-या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

आषाढी पंढरपूर यात्रेसाठी एसटीने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधादेखील पुरविण्यात येणार आहेत.