मलेशिया: अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ८२ धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने केवळ १ गडी गमावून लक्ष्य सहजपणे गाठले. या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय आहे. याआधी उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २०२३ मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ही ट्रॉफी जिंकली होती. या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत केवळ ८२ धावांवर ऑलआऊट झाला. भारताला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी फक्त ८३ धावांची गरज होती, ज्याचा भारतीय संघाने सहज पाठलाग केला. भारताकडून जी त्रिशाने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर वैष्णवी, आयुषी आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. शबनम शकीलला एक विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर भारतीय फलंदाजांनीही चांगली मदत केली. ८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने केवळ एक विकेट गमावली. टीम इंडियाची सलामीवीर जी कामिनी केवळ ८ धावा करून बाद झाली. मात्र, दुसरी सलामीवीर आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या जी त्रिशाने ३३ चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी खेळली. तर सानिका चाळके २२ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिल्या.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘चॉकर्स’ हा शब्द आफ्रिकन क्रिकेट संघासाठी वापरला जातो. मोठ्या टूर्नामेंटच्या फायनलमध्ये किंवा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये हा संघ अनेकदा पराभूत होताना दिसला आहे.