मालवण शहर बांगीवाडा येथील समर्थ ऐश्वर्या कॉम्प्लेक्स ठिकाणी घडली दुर्घटना
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील बांगीवाडा येथे काम सुरू असलेल्या समर्थ ऐश्वर्या कॉम्प्लेक्सच्या इमारतीवरून खाली पडून रोहित कुमार विश्राम चौधरी यां कामगाराच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी कॉम्प्लेक्सच्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर राम आशिष मौर्या याच्यावर मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही दुर्घटना १४ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली होती. चौकशी अंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्घटनेनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. तपासाअंती २८ जानेवारी रोजी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. यात पोलिसांनीच फिर्याद दाखल केली आहे. याबाबत माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे, १४ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता मालवण बांगीवाडा येथील समर्थ ऐश्वर्या या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावर रोहितकुमार विश्राम चौधरी हा काम करत असताना इमारतीचा कॉन्ट्रॅक्टर राम आशिष मौर्या याने त्याच्या तसेच अन्य कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही. त्यांना हेल्मेट न पुरविता, इमारतीस बाहेरील बाजूने संरक्षण जाळी न बसविता, कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून, त्यांना कामाचे योग्य मार्गदर्शन व देखरेख न ठेवता निष्काळजीपणे काम सुरू ठेवले. त्यामुळे रोहितकुमार हा इमारतीच्या आठव्या मजल्यावर बाहेरील बाजूने काम करत असताना लाकडी फळी मोडल्याने जमिनीवर पडल्याने गंभीर दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला होता. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी राम आशिष मौर्या याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारणी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर अधिक तपास करीत आहेत.