देवगड : देवगड शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. स. ह. केळकर महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक सचिन शांताराम दहिबावकर (वय ४१, रा. देवगड सडा) यांना त्यांच्या अनुसूचित जातीवरून द्वेष आणि शत्रुत्वाच्या भावनेने धमकावण्यात आले. तसेच, त्यांच्या प्राध्यापक पदावरील कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून संस्थेचे सभापती, संस्था सदस्य, प्रभारी प्राचार्य यांच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ ऑगस्ट २०१७ ते १६ मे २०२३ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. सहाय्यक प्राध्यापक दहिबावकर यांना सातत्याने मानसिक त्रास देत त्यांच्या अधिकारांमध्ये अडथळा आणण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन दहिबावकर हे १ ऑगस्ट २०१७ पसून शिक्षण विकास मंडळ, देवगड या संस्थेतर्फे संचलित श्री. सदाशिव हरी केळकर महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक (अनुदानित पद) पदावर कार्यरत आहेत. २६ मार्च २०१७ रोजी शिक्षण विकास मंडळ, देवगड या संस्थेतर्फे श्री. स. ह. केळकर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक (अनुदानित) या पदाकरिता मुलाखती घेण्यात आल्या होत्या. हे पद सर्व प्रवर्गासाठी खुले होते. त्यामुळे सचिन दहिबावकर यांची खुल्या प्रवर्गातील जागेसाठी निवड झाली. परंतु सचिन दहिबावकर हे अनुसुचित जातीतील असल्याने संस्थेचे व्यवस्थापन व सभापती अमित सत्यवान जामसंडेकर हे नाराज होते. त्यामुळे १ ऑगस्ट २०१७ ते १६ मे २०२३ या कालावधीपर्यंत संस्थेचे सभापती अमित जामसंडेकर, प्रभारी प्राचार्या डॉ. सुखदा मंगेश जांबळे, कार्यालयीन अधीक्षक बाळकृष्ण विनायक पेडणेकर, परीक्षा कारकून रामचंद्र सदाशिव नारकर, जनसंपर्क अधिकारी साईनाथ अंकुश सुके, शिक्षण विकास मंडळ – देवगडचे सदस्य एकनाथ केशव तेली व शैलेश रमेश महाडिक यांनी एकमेकांच्या संगनमताने मनात द्वेषभावना ठेवून सचिन दहिबावकर यांना महाविद्यालयात त्यांच्या प्राध्यापक पदावरील कामास अडथळा निर्माण केला. तसेच त्यांना वारंवार धमकावून, धाकदपटशा करून शत्रूत्वाची भावना मनात ठेऊन द्वेष भावनेने मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव यांना दहिबावकर यांच्याविरुद्ध खोटे रिपोर्ट पाठविले. तसेच चारचौघांत दहिबावकर यांना फोनवरून व समक्ष धमकावून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या संबंधी खोटी नोटीस देऊन मनस्ताप दिला. याबाबत सचिन दहिबावकर यांनी महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर १५ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी झाल्यानंतर सचिन दहिबावकर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार अमित जामसंडेकर, डॉ. सुखदा जांबळे, बाळकृष्ण पेडणेकर, रामचंद्र नारकर, साईनाथ सुके, एकनाथ तेली, शैलेश महाडिक या संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४६५, १८८, ५०६, ३४ तसेच अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (पी), ३ (१) (क्यू), ३ (१) (यु), ३ (१) (आर) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव करीत आहेत.