राज्यस्तरीय संघांचा स्पर्धेत सहभाग; पाच लाखांची बक्षिसे
चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय सिझन बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धा शहरातील पवन तलाव मैदानावर रंगणार असून स्पर्धेमध्ये १२ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली.
पवन तलाव मैदानावर आ. निकम यांच्या निधीतून नुकतीच टर्फ विकेट बनविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर प्रथमच या मैदानावर सिझन बॉल क्रिकेट रंगणार आहे. या मैदानावर अनेक सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा रंगल्या. चिपळुणात कबड्डी, खो-खो, मल्लखांब, योगा, व्हॉलीबॉल, टेनिस, बुद्धिबळ अशा अनेक खेळांनी चिपळूणचे नाव मोठे केले. येथे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा झाल्या. एकनाथ सोलकर, जुल्फी परकार, गुलाम
परकार, लतीफ परकार, रॉबिन, चंद्रकांत पंडित असे खेळाडू चिपळूणमधून पुढे गेले.
मध्यंतरी माजी आ. बापू खेडेकर यांच्या माध्यमातून येथे सिझन बॉल क्रिकेट होत होते. मात्र, अनेक वर्षे त्यात खंड पडला होता. आता टर्फ विकेट बनल्याने सिझन बॉल क्रिकेट सुरू होणार आहे. पवन तलाव मैदानासाठी आ. निकम यांनी निधी मिळवून दिला. लवकरच या ठिकाणी पॅव्हेलियन, ड्रेसिंग रूम, स्वच्छतागृह उभारले जाणार आहे आणि हे पवन तलाव मैदान क्रीडाप्रेमींसाठी सज्ज होणार आहे.
या ठिकाणी दरवर्षी राज्यस्तरीय क्रिकेट सिझन बॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे. या
स्पर्धेत ए गटातील सामने दि. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होतील. ‘बी’ गटातील सामने दि. १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २ लाख रुपये व चषक, द्वितीय १ लाख रु., तृतीय व चतुर्थ ५० हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. यावेळी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर यांचा गौरव होणार आहे. यावेळी भारतीय क्रिकेटमधील खेळाडू व रणजी खेळाडू स्पर्धेच्या निमित्ताने हजेरी लावणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सूचय रेडीज, मंगेश तांबे, अनिरुद्ध निकम, राजेश सुतार, सचिन कुलकर्णी, विनित देवधर, उदय काणेकर, सुयोग चव्हाण, लतीफ परकार, विक्रम भोसले, योगेश बांडागळे, सुनील रेडीज, अजिंक्य पवार, गणेशकुमार लकडे, साहील कदम व सौरभकुलकर्णी मेहनत घेत आहेत. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण तालुका क्रिकेट असो. ने केले आहे.










