KHANDALA: साहित्यिक अरूण मोर्ये यांच्या शापित सिंहासन अर्थात खरा वारसदार” या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन

The release of the fourth book of the writer Arun Morye titled “Sahit Singhan i.e. The True Heir”.

खंडाळा | वार्ताहर : परिसरातील युवा साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरीचे युवाशक्ती जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये यांच्या “शापित सिंहासन अर्थात खरा वारसदार” या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन ६ मे २०२३ शनिवार रोजी येथील मध्यवर्ती रंगमंचावर ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीचे सरपंच सतीश थुळ यांच्या शुभहस्ते व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर, पंचप्रमुख पांडुरंग गोविंद काताळे, नितीन बैकर, अजय काताळे, प्रथमेश गावणकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

सत्कोंडी गावपुजेनिमित्त आयोजित नमनाच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने नमनप्रेमी व साहित्य प्रेमी जनसमुदाय जमला होता या कार्यक्रमात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर साहित्यिक अरुण मोर्ये यांचे चौथे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. सरपंच सतीश थुळ यानी पुस्तक प्रकाशन झाल्याचे जाहीर करून अरूण मोर्ये यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले ग्रामीण भागातील युवा अरुण मोर्ये हा सामाजिक कामासोबतच साहित्य क्षेत्रात अग्रस्थानी राहून आपले स्वतःचे असे स्थान निर्माण करतो आहे हे आमच्यासाठी कौतुकास्पद आहे.

पुस्तक प्रकाशनासंदर्भात बोलताना साहित्यिक अरूण मोर्ये म्हणाले की, आजवरच्या नमनाच्या तीस वर्षाच्या इतिहासात नमनात काम करताना आणि त्यानंतर गेल्या २५ वर्षात नमनासाठी वगनाट्य लिहितांना एकूण १३ वगनाट्य माझ्या हातून लिहिली गेली आणि त्यातील काहीच नाट्यसंहिता शिल्लक राहिल्या, बाकीच्या गहाळ झाल्या. या साहित्य कृतिंचे जतन व्हावे म्हणून यावर्षी सादरीकरण करत असलेल्या वगनाट्याचे पुस्तक रुपाने प्रकाशन करण्याचा योग आला आणि यानंतर माझ्या हयातीत माझ्या सर्व साहित्याच्या प्रकाशन लवकरात लवकर व्हावे यासाठी मी जरूर प्रयत्न करीन असे ते म्हणाले.

संजय बैकर यांनी शुभेच्छा देताना आजवर १९९५ पासून नमनासाठी आवश्यक असणारी सर्व गीते यामधे गणेश स्तवन, गौळणी, पेंद्या सुदामा गीत , कृष्ण जन्मलीला आणि वगनाट्यातील पदे अशी गीते दरवर्षी अरुण मोर्ये नव्याने लिहितात. या गीतांचे जर संकलन केले तरी त्याची एक पुस्तिका प्रकाशित होऊ शकते. प्रस्थापित साहित्यिकांच्या रांगेत आमच्या गावातील युवक आपले स्थान निर्माण करतो आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

अरूण मोर्ये लिखित शापित सिंहासन अर्थात खरा वारसदार या वगनाट्याचा शुभारंभाचा प्रयोग याच रंगमंचावर संपन्न झाला. यासाठी दुमजली रंगमंच उभारण्यात आला होता. व महानाट्यात जवळपास ७५ कलाकारांनी कला सादर केली.