AAMBOLI: आंबोली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत भाजपचा दणदणीत विजय

BJP’s resounding victory in Amboli Gram Panchayat by-election

विजयी उमेदवार दीपक नाटलेकर यांचा भाजपतर्फे सत्कार

आंबोली । प्रतिनिधी : आंबोलीचे माजी सरपंच गजानन उर्फ बाळा पालेकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोट निवडणूकीत भाजपचे अधिकृत उमेदवार दिपक रामचंद्र नाटलेकर यांचा २९८ मते मिळवित एकतर्फी विजय झाला. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे उमेदवार बुधाजी उर्फ संतोष पाताडे (१८३) यांचा तब्बल ११५ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार विलास गावडे यांना १७ मते पडली.

दरम्यान, विजयानंतर आंबोली भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी माजी सरपंच कै. बाळा पालेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या विजयासाठी आंबोली भाजपा मंडळ कार्यकारीणी सदस्य तथा माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पालेकर यांच्यासह भाजपा कार्यकत्यांनी मेहनत घेवून हा विजय खेचून आणला. या विजयानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली तसेच भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब , सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.