कडवई रेल्वे स्थानकात २२ मे रोजी मनसेचा ठिय्या

 

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई रेल्वे स्थानकातील अनेक समस्यांच्या विरोधात मनसेच्या वतीने सोमवार दिनांक २२ मे रोजी कडवई रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

यामध्ये दिवा सावंतवाडी गाडीला कडवई स्थानकात थांबा मिळावा, रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, प्रवाशी निवारा शेडची व्यवस्था करणे, पाण्याची सुविधा करणे तसेच स्थानकाजवळील घरांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधणे अशा अनेक मागण्यांचे निवेदन क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी यांना मनसेकडून देण्यात आले आहे. मनसेच्या आंदोलनाच्या माध्यमातून जनआंदोलन छेडलयानंतर कडवई रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली. मात्र स्थानक सुरू होऊन दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही अनेक त्रुटी दिसून येत आहेत. सध्या फक्त एकच पॅसेंजर गाडी इथे थांबत असून दिवा सावंतवाडी गाडी थांबत नसल्याने या दशक्रोशीतील प्रवाशांची फार मोठी अडचण होत आहे.

या स्थानकात प्रवाशांना उतरण्यासाठी प्लॅटफॉर्मच नसल्याने गाडी थांबूनही प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. प्रवाशांना उभे रहाण्यासाठी प्रवाशी निवारा शेडची पुरेशी व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. कडवई स्थानकावर डाऊनच्या दिशेने मोठा फलक नसल्याने प्रवाशांची गफलत होत आहे. प्लेटफॉर्मच्या लगत धामनाकवाडी येथील घरे असून फलाटांचे काम करताना माती उत्खनन केल्याने या घरांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी कोणतीही सुरक्षा उपाययोजना नसल्याने धोका निर्माण झाला आहे. अशा अनेक समस्या या स्थानकाला भेडसावत आहेत.

याकडे लक्ष वेधत मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये दिवा सावंतवाडी (५०१०५) या गाडीला तात्काळ कडवई येथे थांबा मिळावा या प्रमुख मागणीसह रेल्वे प्लँटफाँर्मची उंची वाढवावी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रवाशी निवारा शेड बांधण्यात याव्या व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी या मागण्याही करण्यात आल्या आहेत. तसेच प्लॅटफॉर्मच्या बाजूला धामनाक वाडी लगत संरक्षण भिंत बांधण्यात यावी व डाऊनच्या दिशेने कडवई नावाचा मोठा फलक लावण्यात यावा अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार न झाल्यास सोमवार दिनांक २२ मे २०२३ पासून कडवई रेल्वे स्थानकात मनसेच्यावतीने ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. रिक्षा संघटना, व्यापारी संघटना तसेच अनेक सामाजिक संघटनांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरणार असल्याचे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.