नदीवर आंघोळीला गेलेल्या कॉलेज तरुणाचा काजळी नदीच्या पात्रात बुडुन मृत्यू

साखरपा | वार्ताहर : नदीवर आंघोळीला गेलेल्या कॉलेज तरुणाचा काजळी नदीच्या पात्रात बुडुन मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
संगमेश्वर तालुक्यातील तीवरे ढवळवाडीतील श्रेयस रवींद्र ढवळ (वय १७) हा काजळी नदीवर आंघोळीला गेला असता बुरंबी कोंडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. श्रेयस हा उन्हाळी सुट्टी असल्याने गावी आला होता. श्रेयस रत्नागिरी येथे शिक्षण घेत होता. यंदा अकरावी परीक्षा पास होऊन बारावीला गेला होता. अत्यंत मनमिळाऊ व हुशार विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे.
आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याला एक बहीण आहे. त्याच्या आकस्मित जाण्याने सर्वानाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूची खबर मिळताच साखरपा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची खबर साखरपा पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी वैभव कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतदेह शवविच्छेदन करून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुक्रवारी सकाळी 6 वाजता श्रेयस याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कार्यवाही सुरू आहे.