CHIPLUN: चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एकत्रित काम करीत असल्याचे समाधान – पालकमंत्री उदय सामंत

Satisfied that everyone is working together for the overall development of Chiplun city – Guardian Minister Uday Samant

चिपळूण (प्रतिनिधी):- शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व एकत्रित येऊन काम करीत आहोत. चांगल्या कामांना समर्थन, अशी आपली सर्वांची भूमिका आहे, याबद्दल मनस्वी समाधान वाटत असून त्याबद्दल आपल्या सर्वांना पालकमंत्री म्हणून धन्यवाद देतो, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण येथे केले.चिपळूण येथील स्व.इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, सचिन कदम, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, प्रांताधिकारी प्रवीण पवार आदि मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, गेल्या दोन वर्षापूर्वी चिपळूण शहरात पूर आला होता. परत पूर येऊ नये, यासाठी युध्दपातळीवर काम सुरु आहे. पूराचे संकट जोपर्यंत चिपळूणकरांच्या आयुष्यातून जात नाही तोपर्यंत शासन आपली काळजी घेण्यासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

चिपळूण मधील रेड लाईन, ब्लू लाईन हा महत्वाचा विषय आहे. चिपळूणकरांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.विकासाची कामे करीत असताना सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. विकास करताना राजकीय मतभेद बाजूला ठेवून पक्षविरहीत काम व्हायला हवे, असे पालकमंत्री सामंत म्हणाले.स्व. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणासाठी दिलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे. तसेच चिपळूण शहराच्या इन्‍फ्रास्टक्चर डेव्हलमेंट साठी पुढच्या जिल्हा वार्षिक नियोजनामध्ये 5 कोटी रुपयांचा निधी चिपळूण नगरपालिकेला दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री या नात्याने श्री.सामंत यांनी दिली. या निधीमधून चिपळूण शहाराचा कायापालट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी क्रीडा संकुल, सिंथेटिक कोर्ट बनविणे, श्री. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळयाभोवतीचे सुशोभीकरण, चिपळूण नगरपालिका हद्दीतील जि.प.प्रा.शाळा गोवळकोट भोईवाडी नवीन इमारत बांधणे, या विकासकामांचे भूमीपूजन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न झाले.हे नाटयगृह दि.15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु होईल, अशी माहिती यावेळी चिपळूण मुख्याधिकारी श्री.प्रसाद शिंगटे यांनी दिली.