‘जगबुडी’ नदीचे पात्र बकाल; पाणीप्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे

खेड(प्रतिनिधी) भरणे येथील जगबुडी नदीपात्र झुडपांच्या विळख्यात अडकले आहे. नदीपात्रात सगळीकडे झुडपे वाढलेली असतानाही तोडण्यासाठी ग्रामपंचायतीला सवड मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्षानुवर्षे परिस्थिती कायम असून या बकाल नदीपात्रामुळे पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने पाणीप्रश्न अधिक गंभीर बनणार आहे. त्यामुळे नदीपात्र मोकळे करण्यास ग्रामपंचायत पुढाकार घेणार तरी कथी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बारमाही वाहणाऱ्या भरणे येथील जगबुडी नदीपात्रात जगबुडी पुलापासून तालुका कृषी खात्याच्या जागेपर्यंतचा परिसर झुडपांनी झाकला आहे. नदीपात्रातील पाणीसाठ्यात रणरणत्या उन्हामुळे घट होत असताना झुडपांमुळे पाणी अधिक प्रमाणात कमी होत आहे. वर्षानुवर्षे ही झुडपे कापण्यात न आल्याने सद्यस्थितीत ती मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. याचा परिणाम पात्रातील पाणीसाठ्यावर होत आहे. याच नदीपात्रात एका बाजूला कचरादेखील तरंगत आहे. यावरही अंकुश ठेवण्यात ग्रामपंचायतीला अपयश आल्याने आता झाडी-झुडपांच्या वेढ्यामुळे दुहेरी संकटात नदीपात्र अडकले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या उदासीन भूमिकेमुळे नदीपात्राला बकालपणा आला आहे.
पाणीटंचाईच्या तोंडावर जगबुडी नदीपात्र झुडपांच्या विळख्यात अडकलेले असतानाही ही झुडपे तोडण्याबाबत  प्रशासन कार्यवाही न करता एकमेकांकडे बोट दाखवण्यातच धन्यता मानत आले आहे. गेली अनेक वर्षे यातून मार्ग काढण्यात न आल्याने ही समस्या कायम आहे. त्यातच भरणे येथे २ पुलांची उभारणी झाल्यामुळे नदीपात्रातील वाहते पाणी अडत आहे. यामुळे पुढील नदीपात्र दिवसेंदिवस कोरडे पडत असून त्यात कडक उन्हाची भर पडल्याने
पाणीसाठ्यात घट होत आहे. नदीपात्रात वाढलेली झाडीझुडपे तोडल्यास मुबलक प्रमाणात पाणीसाठा
होण्यास मदत होणार आहे. यामुळे नजीकच्या काळात भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने झाडी-झुडपे तोडण्यासाठी पुढाकार घेवून परिसर मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.