देव्हाऱ्यातील देव नाही पण देवासारखी माणसं जीवनात भेटली याचा आनंद : आ. निलेश राणे

सावंतवाडी । प्रतिनिधी :

गेली काही वर्षे मी स्वतःहून माझा वाढदिवस साजरा करीत नाही. पण संजू सारखे माझे मित्रच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा करतात. त्यांचं हे प्रेमच मला अधिक ऊर्जा देतं. मला देवाऱ्ह्यातील देव कधी देव भेटला नाही पण जिवनात देवासारखी अनेक माणसं मात्र भेटली याचाच आनंद आहे, अशा शब्दांत आ. निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांप्रती ऋण व्यक्त केले.

संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून सावंतवाडी येथील हॉटेल मॅंगोच्या सभागृहात आ. निलेश राणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

ते म्हणाले, मी मागील दहा वर्षात खूप काही पाहिलं. खूप संघर्ष करावा लागला. वास्तविक पाहता राणे म्हणजेच संघर्ष. मागील काही वर्षात खूप सहन केलं. विरोधक आमच्या घरापर्यंत पोहोचले होते. केलेला संघर्ष खूप मोठा होता. अनेक किल्ले ढासळत असताना राणेंचा गड मात्र शाबूत ठेवला हीच खरी ताकद आहे. या संघर्षाच्या काळात संजू परब यांच्यासारखे अनेक खांदे कार्यकर्ते भावाप्रमाणे माझ्या सोबत राहिले. कार्यकर्त्यांचं हेच प्रेम हीच माझ्यासारख्याची खरी ताकद आहे असेही ते म्हणाले.

लोकांना वाटतं की मी रागीट स्वभावाचा आहे मात्र माझ्यासारखा सोज्वळ माणूस नाही. आता माझा चेहराचं तसा आहे. त्यात दाढी. पण सध्या दाढीचीच चलती आहे अशी मुश्किल टिपणी करतानाच ते म्हणाले की कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी कधीतरी आक्रमक व्हावंच लागतं. राणे साहेबांकडून आम्ही जन्मजातच तो आक्रमक पवित्रा आत्मसात केला आहे. बाळासाहेब नेहमीच म्हणायचे की समोरच्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत बोलावं लागतं. त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज बनायचा प्रयत्न करणं हे महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

आ. दीपक केसरकर यांच्याकडून अनेक गोष्टी शिकतोय. त्यांच्या सोबत असल्याने माझ्यात बदल झाला आहे. पण भिती आहे की माझ्या स्वभावाचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये, अशी मिश्किल टिपणीही त्यांनी केली. आज कोकणातील विविध प्रश्नांना मी सभागृहात वाचा फोडत आहे. २८८ आमदारांच्या सभागृहात माझ्यासारखा आमदार जे काही शक्य होतं ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण ते सोप्प नाहीय. तिथे आपले प्रश्न मांडणं व आपल्याला हवं तस करून घेणं हे सोप नाहीय. त्यासाठी आमचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच आ. केसरकरांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. केसरकर यांनी मंत्री म्हणून तसेच सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी आणलेला हजारो कोटी रुपयांचा निधी हे त्यांचं कार्य निश्चितच वाखाणण्याजोग आहे. त्यांच्या याच कार्याच्या प्रेरणेतून काम करण्यासाठी व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. फक्त तुमचं प्रेम व तुमचा पाठिंबा हा महत्त्वाचा आहे.

संजू तुझे व सहकाऱ्यांचे मनापासून आभार. संजू नेहमी नवनवीन पद्धतीने वाढदिवस साजरा करतो. तो माझा भाऊच आहे. त्यामुळे हक्काने बोलतो. तुमचा हे प्रेम नेहमीच असंच माझ्या पाठीशी राहू दे मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.