निलेश राणे वाढदिवस विशेष लेख :कणखर नेतृत्व

नरेंद्र मोहिते- राजापूर :संघर्ष करत कायमच विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून भक्कम आधार देणारं एक कणखर नेतृत्व म्हणजे निलेश राणे होत. मधल्या काळातील दहा वर्षाच्या संघर्षानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या पारंपारिक कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातुन सन २०२४ च्या विधानसभान निवडणूक विजय मिळवत आमदार म्हणून निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रवेश केला आणि पुन्हा एक नवं पर्व सुरू झाले. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला हक्काचा आमदार मिळालाच पण संपुर्ण कोकणाला विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे आपलं हक्काचे नेतृत्व राज्यातील विधिमंडळात पोहचल्याचा सर्वाधिक आनंद झाला.

विधासभेत काम करताना नागपूर आणि मुंबई या दोन ठिकाणी झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आपल्या अभ्यासपुर्ण भाषणांनी मतदार संघच नाही तर कोकणातील विविध प्रश्नांना वाचा फोडत निलेश राणे यांनी आपल्या कार्यपध्दतीची चुणूक दाखविली आहे.

कोणतेही काम असो.. ते होण्याची शंभर टक्के खात्री.. बघतो.. करतो.. पहातो.. हे शब्द ज्यांच्या शब्दकोषात नाहीत.. आपल्याकडे कोणतेही काम घेऊन आलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी, कार्यकर्त्यांसाठी कायमच तत्पर असणारे प्रत्येकांचं हक्काचं नेतृत्व म्हणजे निलेश राणे होत.. सर्वसामान्य जनतेच्या कामाचा झटपट निपटारा करून त्यांना न्याय देणारा सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणजे निलेश राणे..

गेली १६ वर्षे आपल्या भागातील जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी धडपडणारा एक हक्काचा माणूस म्हणजे निलेश राणे होत.. त्यामुळे आज प्रत्येक जण निलेश राणे साहेबांकडे गेलं की आपलं काम होणारच असे हक्काने बोलतो.. त्याचं एकमेव कारण म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी कायमच झटणारं नेतृत्व म्हणून त्यांची असलेली ओळख. आपल्या कामाने, कार्यकतृत्वाने सर्वसामान्य जनतेच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात ‘हक्काचा माणूस’ म्हणून निर्माण केलेली प्रतिमा होय.

राज्यात नव्हे तर देशाच्या राजकारणात एक वलयं असलेलं नाव म्हणजे ‘राणे’. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एक आगळी वेगळी ओळख आणि दरारा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात काम करताना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे व माजी खासदार कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. निलेश राणेंच्या बाबतीत बोलायंचे झाले तर तरूणांचे आयडॉल असलेलं हे उमदं असे नेतृत्व आहे. सन २००९ पासून आजपर्यंत आपल्या वेगळया कार्यपध्दतीने आणि आक्रमक नेतृत्व शैलीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकिय पटलावर एक वादळं निर्माण करणारं असं हे नेतृत्व आहे. पद असो वा नसो, सत्ता असो या नसो दबदबा आणि रूबाब आमचाच हे त्यांनी आपल्या कृतीतुन कायमच सिध्द केलंय. खासदार म्हणून त्या पाच वर्षात त्यांनी देशाच्या संसदेत आपल्या अभ्यासपुर्ण भाषणांनी पाडलेली छाप आणि विस्तीर्ण अशा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील प्रत्येक गाव आणि वाडीच्या कानाकोपऱ्यातील विकास कामांना दिलेला न्याय जनतेच्या आजही लक्षात आहे. दांडगा लोकसंपर्क आणि धडाडीने काम करण्याची त्यांची वृत्ती यामुळे आजही अगदी २० वर्षाच्या तरूणापासून ते ८० वर्षाच्या वयोवृध्दांनाही ते आपले वाटतात.

आपल्या मतदार संघात कायमच जनतेशी नाळ जुळलेल्या या नेत्याने कधीही जनतेला वाऱ्यावर सोडलं नाही. निसर्ग चक्रीवादळ असो, फयान असो, पावसाळयातील अतिवृष्टी असो, आपल्या जनतेवर आणि कार्यकर्त्यावर ओवढलेला कोणताही बाका प्रसंग असो, समजताच क्षणी धाऊन येत प्रसंगी मदतीचा हात आणि आधार देण्याचं काम निलेश राणे यांनी केलं आहे व आजही करत आहेत. दिलेला शब्दा पाळणारा राजकारण आणि समाजकारणातील एक हक्काचा माणूस अशी त्यांची सामान्यांत ओळख आहे.

सन २००९ ते २०१४ या कार्यकाळात खासदार म्हणून त्यांनी केलेल्या कामाची आजही लोक आठवण काढतात. मात्र त्यानंतर पुढे २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात निलेश राणे यांनी केलेला संघर्षही जनतेने पाहिला. मात्र कोणतेही नसले तरी चालेल आपल्या नावात राणे आहे त्यामुळे आपण कुठेही काम करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.

सन २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातुन ते शिवसेनेचे आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आणि मतदार संघाला हक्काचा लोकप्रतिनिधी मिळाला. पण निलेश राणे यांचे काम मतदार संघापुरते मर्यादित नाही, त्यांचा चाहता वर्ग मोठा कोकणासह महाराष्ट्रात त्यांचा असलेला दांडगा लोकसंपर्क यामुळे संपुर्ण राज्यात त्यांना माननारा मोठा वर्ग आहे. खास करून तरूणांमध्ये त्यांची आगळी वेगळी क्रेझ आहे.

विधानसभेत निवडून आल्यानंतर पहिल्याच झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी आपल्या मतदार संघासह कोकणातील प्रश्नांना वाचा फोडली. तर सध्या मुंबईत सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा आपल्या अभ्यासपुर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. अर्थसंकल्पावरिल चर्चेत सहभागी होत बोलताना त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनीही निलेश राणेंच्या अभ्यासू व मुद्देसुद भाषणाची दखल घेत कौतुक केले आहे.

कायमच अन्यायाविरोधात पेटून उठा असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. कोणताही प्रश्न असो त्या विरोधात बिनधास्पपणे आवाज उठविला आणि त्या प्रश्नांची तड लावली आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नांना वाचा फोडणारा नव्हे ते सोडवून देणारा हक्काचा आपला माणूस म्हणून आज अनेकजण निलेश राणे यांचे नाव घेतात.

अनेकांना निलेश राणे हे एक आक्रमक, करडया शिस्तीचे वाटतात.. हो ते तसे आहेतही.. पण त्यांच्यातही एक दिलदार मित्र.. संवेदनशील माणूस लपलेला आहे.. दौऱ्यात अनेक वेळा आपल्या सहकाऱ्यांची आपुलकीनं चौकशी करणारे निलेश राणे कधी कधी गप्पांच्या मैफिलीतही रंगून जातात.. अगदी दिलखुलासपणे.. प्रत्येकाची आवर्जुन चौकशी करतात..भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारून आपुलकीनं चौकशी करतात..अनेकवेळा दौऱ्यात त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लहानांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकाची चढाओढ लागलेली असते.. मात्र ते कुणालाही नाराज न करता प्रत्येकासोबत सेल्फी काढतात.. त्यामुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात. असे नेतृत्व कोकणाला आणि आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग वासीयांना लाभले हे आमचे भाग्यच.. अशा या दिलदार नेतृत्वाला वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा..!