महावितरणच्या भोंगळ कारभाराचा वृद्धेला ‘शॉक’

तक्रारीनंतर ५ हजारांचे वीजबिल थेट १०५ वर

सावंतवाडी । प्रतिनिधी :

मळगाव देऊळवाडी येथील वयस्कर महिला श्रीम. देऊलकर यांना महावितरणच्या भोंगळ कारभाराचा शॉक बसला होता. तिला नेहमी शेकड्यात येणारं वीज बील तब्बल ५ हजार ३४६ रूपये आल्यानं ती हादरून गेली होती. बुधवारी सावंतवाडीत झालेल्या ग्राहक मेळाव्यात तिने आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर कथन केली त्यानंतर पडताळणीअंती तिला केवळ १०५ रुपये असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महावितरणच्या भोंगळ कारभार उघडकीस आला. मात्र झाल्या प्रकाराने सदर वृद्धेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सावंतवाडी व्यापारी संघातर्फे आयोजित ग्राहक मेळाव्यात उपस्थित सदर महिलेने आपल्याला आलेल्या ५ हजार वीज बिलासंदर्भात कार्यकारी अभियंता विनोद विरप यांच्याकडे तक्रार केली. यानंतर विरप यांनी तात्काळ याची चौकशी करून त्या आजींना न्याय मिळवून देण्यासाठीच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या. यानंतर हे वीजबील केवळ १०५ रूपये असल्याचे निदर्शनास आले. मीटर फॉल्टी असल्यानं हे बील वाढीव स्वरूपात आल्याच संबंधितांनी सांगितले.

त्यानंतर तर हे वीजबील कमी करून देत त्या वयस्कर आजींना दिलासा मिळवून देण्यात आला. याबद्दल त्या आजींनी व्यापारी महासंघाचे आभार मानले. पाच हजाराच बील शेकड्यात असल्याच समजताच व्यथीत आजींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होत. विज बील कमी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

Sindhudurg