Pune Accident: Bus collides with six vehicles near Undri; two killed in strange accident, what happened?
पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या कारने 5 ते 6 कारला धडक दिली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत
मोहम्मदवाडी परिसरात अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हा अपघात तीव्र उतारावर झाला. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अपघाताचे काही फोटोही समोर आले आहेत. अनेक गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. एक रिक्षा उलटली. फूटपाथवरील काही दुकानांचेही नुकसान झाले आहे.
नेमके काय घडले?
ही घटना उंड्री परिसरातील एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर रविवारी रात्री साडेसात वाजता घडली.
या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (वय 37, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) आणि दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक मधु कुवर, रिक्षा प्रवासी अॅलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोतील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (उर्वरित लेन क्र. 3, सय्यदनगर, हडपसर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोंढवा पोलिसांनी बस चालक आरोपी मैनुद्दीन मेहबूब शेख (वय ४२, रा. नाना पेठ, कॅम्प चौक, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. ही मिनी बस टाइम ट्रॅव्हल कंपनीच्या मालकीची आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावरील ऑर्किड पॅलेससमोरील उतारावर वाय जंक्शनजवळ बसचा (क्र. एमएच १२-एचबी ०२४२) ब्रेक निकामी झाला. यामुळे बस उतारावरून पळून गेली. बसने समोरून येणाऱ्या सहा वाहनांना धडक दिल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. इतर चार जण गंभीर असून त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात एक टेम्पो, एक रिक्षा आणि एका दुचाकीसह तीन कारचे मोठे नुकसान झाले. मोहसीन शेख (रा. जुना मोदीखाना, कॅम्प), निखिल बक्षी (रा. न्याती हॉस्पिटल सोसायटी) आणि राजेश जेडीपाल (रा. रहेजा विस्टा सोसायटी) यांच्या गाड्यांचे नुकसान झाले. जेडीपाल हेही किरकोळ जखमी झाले आहेत.