खेड(प्रतिनिधी) ओंबळीमार्गे खेडला येणाऱ्या खासगी आराम बसची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील राहुल श्रीरंग साळुंखे (२७), सिध्देश गणेश सकपाळ (२३, दोघेही रा. ओंबळी-पोलादपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी ७ च्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील ओंबळीनजीक घडला.
मंदिरातील वीजपुरवठा बंद करण्यासाठी जात असताना घडलेल्या दुर्घटनेने शिमगोत्सवाच्या धामधुमीत गावावर शोककळा पसरली आहे. गावातील शिमगोत्सव तातडीने रद्द करण्यात आला.
ओंबळी येथे शनिवारी रात्री उशिरापर्यंत शिमग्याचे कार्यक्रम सुरू असताना पहाटेपर्यंत गाव जागेच होते. गावच्या मंदिरातील प्रकाश व्यवस्था सुरूच राहिल्याने दोघेजण सकाळी ६.४५च्या सुमारास वीजपुरवठा बंद
करण्यासाठी एमएच ०४ केएन ८२२१ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना तीव्र वळणावर एमएच ०४ एलवाय ९१९९ या क्रमांकाच्या खासगी आराम बसला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलादपूर पोलीस निरीक्षक अनिल जाधव व सहकारी घटनास्थळी पोहोचले. अपघाताची प्रेमचंद महात्ता चौधरी (५०, ऐरोली-नवी मुंबई) याच्यावर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाडिक अधिक तपास करत आहेत.