दोन कदम एकत्र आल्याने दापोलीत फक्त शिवसेनेचाच दम

माजी आमदार संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य 

दापोली/ खेड | प्रतिनिधी : दापोली विधानसभा मतदार संघांमध्ये शिवसेना नेते रामदाभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्य मंत्री योगेश कदम व माजी आमदार संजय कदम हे दोन कदम एकत्र आल्याने दापोलीत फक्त शिवसेनेचाच दम असणार आहे, बाकी कुणाचेही राजकारण येथे चालणार नाही असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे व्यक्त केले.

दापोली विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार व उबाठा चे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास भाई कदम, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आ. अशोक पाटील, माजी आमदार राजन साळवी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी ना. एकनाथ शिंदे म्हणाले, कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला असून, प्रथम माजी आमदार राजन साळवी व आज संजय कदम यांच्या घरवापसीमुळे पुन्हा हा बालेकिल्ला मजबूत झाला आहे. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देणाऱ्या बोक्याना मिळालेली ही चपराक आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुणाची याचे उत्तर जनतेने दिले आहे, त्यामुळेच आज दररोज हजारो कार्यकर्ते मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहे. राज्याचा मुख्यमंत्री असताना दापोली व रत्नागिरी मतदार संघाला प्रत्येकी 3 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. बाळासाहेबांच्या विचारानुसार आमचा पक्ष सुरु आहे.

या पक्ष प्रवेशामुळे शिवसैनिकांचा संघर्ष संपला : गृहराज्य मंत्री योगेश कदम

राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले की माजी आमदार संजय कदम यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसैनिकांचा संघर्ष संपला असून गावागावातील राजकीय भांडणे मिटणार असून पक्ष मजबूत होणार असून 2029 ची विधानसभा निवडून सोपी झाली असून संजय कदम यांच्या राजकीय अनुभवाचा उपयोग मला व दापोलीकरांना होणार असून आम्ही दोघे हातात हात घालून दापोली विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करू :  माजी आ. संजय कदम

यावेळी बोलताना माजी आमदार संजय कदम म्हणाले,1990 पासून आपण रामदास भाई कदम यांच्या नेतृत्वाखाली काम केले असून, त्यांचा गुहागर येथे पराभव झाल्यावर राजकारण बदलले गेले व मी शिवसेनेतून बाजूला झालो, मात्र गेल्या अडीच वर्षात दापोली मतदार संघात एकनाथ शिंदे यांनी जो निधी दिला त्यामुळे गावागावात विकास कामे झाली, त्यामुळे प्रभावित होऊन आपण शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली व गृह राज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहकार्याने शिवसेनेत प्रवेश केला असून पुढील सर्व काळात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करू.
खालिद रखांगे पुन्हा ठरले किंग मेकर
दापोलीचे उपनगराध्यक्ष व नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले दापोलीच्या राजकारणातील किंग मेकर खालिद रखांगे यांनी माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होण्यासाठी महत्व पूर्ण भूमिका बजावली.

शिवसेना उपनेतेपदी निवड 
माजी आ. संजय कदम यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली असून तसे नियुक्तीपत्र त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.