SAWANTWADI: पोलीस कारवाई व मारहाणीची धमकी दिल्यानेच बाजार हलवण्यास राजी

They agreed to move the market only after threatening police action and beating

हॉकर्स संघटनेचा खळबळ जनक आरोप

मंत्री केसरकरांचा दुराग्रह व प्रशासनावर दबाव

सावंतवाडी । प्रतिनिधी : हॉकर्स संघटनेतील सर्व व्यापारी तसेच दोन हजार ग्राहकांची लेखी मागणी असतानाही केवळ स्वतःच्या दुराग्रहापोटी मंत्री दीपक केसरकर यांनी तलावाकाठचा बाजार हलवला.
मुख्याधिकाऱ्यांवरही मंत्र्यांचा दबाव असल्याचे स्पष्टपणे जाणवले. त्यामुळे प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना पोलिस कारवाईची तसेच मारहाणीची धमकी आल्यामुळेच बाजार हलविण्यासाठी हॉकर्स संघटना राजी झाली, असा खळबळजनक आरोप हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.दरम्यान, आम्ही कोणालाही मॅनेज झालो नाही किंवा कोणाच्याही दबावाला बळी पडलो नाही केवळ दगडापेक्षा वीट मऊ या तत्त्वाने होळीच्या खुंटाच्या जागेपेक्षा गोडाऊनकडील जागा पर्याय म्हणून आम्ही स्वीकारली. मात्र, दोन आठवड्यात जर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी व आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पूर्ण केल्या नाहीत तर बाजार होता तिथेच मोती तलावाच्या काठी आम्ही हलवू, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, जिल्हा सेक्रेटरी महेश परुळेकर, अजय जाधवमहेश बेळगांवकर, आलिफ खान, बाबा साहब दर्गावाले, राजू लेंगडे, नाझिन पटेल आदी उपस्थित होते.सावंतवाडी आठवडा बाजार हा मोती तलावाकाठीच राहावा यासाठी आमचे शेवट पर्यंत प्रयत्न होते व आजही आहेत. त्यासाठी आम्ही स्थानिक आमदार तथा मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब व अन्य राजकीय पदाधिकारी यांना निवेदने देऊन चर्चा केली. मात्र, केसरकरांनी हा बाजार मोती तलावावरून हटवण्यासाठी आपलं पूर्ण वजन वापरलं. मग पालकमंत्री रविंद्र चव्हाण व संजू परब यांनीही वजन वापरायला हवं होतं. मात्र, तस झाल नाही. त्यामुळे तुमच्या राजकारणात आम्हाला ओढू नका. फेरी वाल्याचं हित हेच आमचं ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

आठवडा बाजारासाठी केसरकारांनी होळीचा खुंट ही जागा सुचवली होती. मात्र,
केसरकरांनी सूचवलेल्या सर्व जागा आम्ही नाकारल्या. तेथे नागरिकांची मोठी गैरसोय झाली असती. त्यामुळे फेरीवाल्यांच्या संमतीनेच ही जागा आम्ही निवडली. जुन्या न्यायालयाच्या आवाराची जागाही आम्ही मागितली होती. तसेच शिव उद्यानाच्या समोरील रिकामी जागाही आमच्या मागणीचा भाग आहे. कपडे व अन्य व्यापाऱ्यांसाठी ती जागा आम्ही ठेवली आहे. अन्यत्र बसणारे मसाला व्यापाऱ्यांनी काही दिवस आम्ही त्याच ठिकाणी व्यापार करू असे आवाहन आम्हाला केले आहे तर कापड व अन्य व्यापारी आमच्या संघटनेचे सदस्य नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.
मोती तलावाकाठी बाजार भरताना कौन्सिलचा ठराव झाला याबाबत आम्ही प्रशासनाकडे माहिती मागितली असता त्यांनी तसा ठराव झाला नसल्याचे सांगितले मात्र जर तसा ठराव झाला असेल तर त्या ठरावास अनुसरून जिल्हा प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आता बाजार भरत असलेली जागा गैरसोयीची आहे हे आम्हाला मान्य आहे. तेथे असलेल्या पुरातन झाडांमुळे अपघात होऊ शकतो. गोडाऊनच्या मागच्या भागात दिलेल्या जागेत पावसात चिखल होणार आहे. त्यामुळे याबाबत आम्ही प्रशासनाचे तसेच केसरकर यांचेही लक्ष वेधले त्यावेळी सर्व गैरसोयी लवकरच दूर करणार असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी आपला शब्द पाळावा, अन्यथा आजही आम्ही तलावाच्या काठची भूमिका सोडली नाही. व्यवस्था झाली नाही तर पुन्हा आम्ही तलावाकाठीच बाजार भरवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.दरम्यान, सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. त्यावेळी झालेल्या बैठकीसाठी काही लोक अनुपस्थित राहिले. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घ्यायची नाही केवळ व्यापाऱ्यांचे व ग्राहकांचे हित आम्ही पाहत आहोत. मात्र, राजकीय पक्षांकडून आठवडा बाजाराचं केवळ राजकारण केलं जात आहे. मात्र, आमच्या हिताच्या विरोधात जो जाईल त्यांना निवडणूकीच्या वेळी आमची ताकद दाखवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.