सामाजिक बांधिलकी संघटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड समोरील आंबोलीकडे वळणाऱ्या रस्त्यावरील गटार उघडे असल्याने अपघात होत आहेत. तरी या गटारावर झाकण घालून हा रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड समोरील आंबोलीकडे वळणाऱ्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा तोल जाऊन मुलीसहित ती रस्त्याच्या बाजूचे उघडे गटारामध्ये पडली. त्यामुळे तिच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. चार दिवसांपुर्वी सदर गटारात पडून वृद्धा व्यक्ती जखमी झाली होती. तिला तेथील जवळच्या वर्तमानपत्र विक्रेत्याने बाहेर काढून त्यांचेवर उपचार केलेले आहेत. तसेच लहान मुलीलाही दुखापत झाली. या गटारात वृद्ध व लहान शाळकरी मुले देखील पडत आहेत.
यापूर्वीही याबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्यांनी दिलेल्या आश्वासनास अडीच महिने उलटूनही आपण सदरची गटारे बंद केलेली नाहीत. त्यामुळे ३० मे पर्यंत जर आपणाकडून सदरची गटारे बंद करणेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही तर सदरची गटारे बंद करण्यास आपण असमर्थ व अकार्यक्षम आहात असे गृहीत धरुन पावसाळ्यात सदरच्या उघड्या गटारात पडून जीवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून लोकवर्गणी काढून त्यातून सदरच्या गटारावर फरशा घालण्याचे काम आम्हास सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून करणे भाग पडेल, असेही या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.