रत्नागिरी । प्रतिनिधी :
“आव्हाड साहेब तुम्ही राजापूरचे नाही, मंत्र्यांवर, घटनेवर बोलताना सभागृहाला पुरावे द्या”, असे म्हणत कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे यांनी कोकणावर टीका करून राजापूर घटनेचे चुकीचे चित्र सभागृहात मांडू पाहणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भर सभागृहात रोखले. आ. राणे यांचा एकूणच पवित्रा बघून आ. आव्हाडांनी आपल्या बोलण्याचा रोखच बदलला आणि सगळे सभागृह आवक झाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवटच्या आठवड्याचे कामकाज सुरू आहे. अशाच प्रश्नोत्तराच्या तासावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहामध्ये राजापूरच्या होळी दरम्यान झालेल्या घटनेवरून चुकीचे चित्र मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्री आग लावून बाहेर गेले असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. आ. आव्हाड यांनी सभागृहात मंत्र्याचे नाव घेतले नसले तरीही त्यांचा रोख सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर होता.
मात्र यावेळी सभागृहात उपस्थित असलेले कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे यांनी त्यांना प्रश्नोत्तरदरम्यानच अडवले. यावेळी आ. आव्हाड जी माहिती सभागृहात मांडत होते तसेच मंत्र्यांना उद्देशून त्यांनी केलेला टिपणीवर कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे यांनी आक्षेप घेतला. आव्हाड यांचे बोलणे सुरू असतानाच त्यांना थांबवले. ‘एक मंत्री बाहेर गेले आणि आग लावली ‘, या आव्हाडांच्या वाक्यावर आ. राणे यांनी आक्षेप घेतला. ‘आव्हाड जी वाक्य बोलले त्याचा काय अर्थ होतो हे त्यांनी सभागृहाला सांगावे, काय संबंध होता त्या मंत्र्यांचा राजापूर घटनेशी? त्यांच्याकडे कोणता पुरावा असेल तर त्यांनी तो द्यावा. राजापूरला नेमके काय घडलं…आव्हाड साहेब तुम्ही राजापूरचे नाहीत…’, असं म्हणत निलेश राणे पुढे म्हणाले ‘सिच्युएशन पहिल्या तासात कंट्रोल मध्ये होती, आऊट ऑफ कंट्रोल नव्हती, तुम्ही एका मंत्र्यावर आरोप करताय, तुमच्याकडे कसला पुरावा आहे का ते सभागृहाला सांगावं.’
आ. निलेश राणे यांनी अशी आक्रमक भूमिका सभागृहात घेतल्यानंतर मात्र आ. आव्हाड यांनी आपल्या बोलण्याचा रोख बदलला. मी कुणाचेच नाव घेतले नाही असे सांगत ते मूळ प्रश्नाकडे वळले. त्यांच्या बदललेल्या या पवित्र्यामुळे सभागृह सुद्धा आवक झाले.













