Veral-Medha-Pachwad new state road will be created from Khed!
खेड | प्रतिनिधी : सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडील भाग आणि पश्चिम भाग जोडणाऱ्या वेरळ खोपी फाटा ते कुळवंडी- खोपी – रघुवीर घाट – शिंदी – वळवण -अकल्पे दरेतांब- पिंपरी – उचाट- वाघावळे- कोळघर- मेढा- कुडाळ- पाचवड ते राष्ट्रीय महामार्ग क्र.४ दरम्यान १३१ किमी अंतराचा नवीन राज्य मार्ग तयार होणारं आहे. या प्रस्तावात सातारा जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग-१९, प्रमुख जिल्हा मार्ग-१४४ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग-१९ यांचा दर्जा सुधारून नवीन राज्यमार्ग क्रमांक ४६१ तयार करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने ९ मे रोजी शासन निर्णय काढला आहे.
दक्षिण उत्तर असलेले पुणे बंगलोर व मुंबई गोवा हे दोन राष्ट्रीय महामार्ग या नवीन राज्यमार्ग मुळे जोडले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्हा थेट सातारा जिल्यातील प्रमुख शहरांशी जोडला गेल्याने पर्यटन व व्यापार उदिम यामध्ये वाढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत मुंबई गोवा महामार्गावर असेलल्या खोपी फाटा ते सातारा जिल्ह्यातील अकल्पे या दरम्यान एस टी बस वाहतूक सुरू असणारा मार्ग उपलब्ध आहे मात्र या मार्गावरील सुमारे दीड किमीचा भाग अवर्गीकृत असून पावसाळ्यात या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक असते. दरम्यान या प्रस्तावित राज्य मार्गावर सातारा व रत्नागिरी जिल्ह्यंना जोडणारा रघुवीर घाट गेल्या काही वर्षात धोकादायक ठरला आहे. रस्त्याच्या दर्जोंत्तीमुळे रघुवीर घाटाच्या दुरुस्तीला चालना मिळून हा घाट वाहतुकीला सुलभ होण्याची आशा वाहनचालकांनी केली आहे. रघुवीर घाटातील पावसाळी पर्यटनाला या राज्यमार्ग मुळे अधिक चालना मिळेल तर पावसाळ्यात अतिवृषटीमुळे कुंभार्ली व आंबा हे प्रमुख घाट बंद पडल्यास आणखी एक नवीन पर्यायी मार्ग रत्नागिरी जिल्ह्यातील वाहनचालकांना उपलब्ध होणार आहे.