‘संजय गांधी योजने’तून महिन्याला ७.६ कोटींचे वाटप

खेड तालुक्यात ५,५९८ लाभार्थ्यांचा समावेश; ‘डीबीटी’मुळे पेन्शन थेट खात्यात जमा
खेड(प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा देण्यात येणाऱ्या १,२०० रुपयांच्या पेन्शनमध्ये गतवर्षापासून ३०० रुपयांनी वाढ झाली असून तालुक्यातील ५ हजाराहून अधिक निराधार व्यक्तींना याचा लाभ मिळत आहे. वाढीव अनुदानामुळे तालुक्यात महिन्याला वाटप केले जाणारे ७ कोटी ६ लाख ४९ हजार ४०० रुपयांचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना ‘आधार’ ठरत आहे.
दरम्यान, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) या ऑनलाईन प्रणालीमुळे दोन महिन्यांची पेन्शन एकाच महिन्यात मिळाल्याने लाभार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
शासनाकडून निराधार, वृद्ध, अंध, दिव्यांग, अनाथ मुले, तृतीयपंथी, शारीरिक व मानसिक आजारग्रस्त, विधवा, परित्यक्त्या, अत्याचारित व घटस्फोटीत महिला, दारिद्र्यरेषेखालील निराधार कुटुंबे तसेच वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार योजनेतून अनुदान अदा केले जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील ५,५९८ लाभार्थी शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत.
यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे ३,४३० लाभार्थ्यांना प्रतिमहिना ५ कोटी १ लाख ४५ हजार इतके अर्थसहाय्य मिळत आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या १,५४५ लाभार्थ्यांसाठी दरमहा २ कोटी ३ लाख १७हजार ५०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेच्या ६१९ लाभार्थ्यांसाठी १ लाख ८५ हजार ७०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेच्या चार लाभाथ्यर्थ्यांना १,२०० रुपये अदा करण्यात आले.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री/पुरूष मरण पावल्यास वारसाला इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेंतर्गत एक रक्कमी २० हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. या योजनेचे गेल्या १० वर्षात १९५ जण लाभार्थी ठरले आहेत. यापूर्वी अर्थसहाय्य वाटपात २-३ महिन्यांच्या अनियमिततेमुळे ग्रामीण लाभार्थ्यांना शहराच्या ठिकाणी येरझारे घालताना पदरी निराशाच पडत होती. यामुळे नाराजीचा सूर आळवून ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत होती.
या धर्तीवर केंद्र सरकारने डिसेंबर २०२४ पासून डीबीटी प्रणाली राबवत पेन्शन थेट खात्यात जमा करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय अनुदानात ३०० रूपयांची वाढ करून १,५०० रूपये पेन्शन करण्यात आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची पेन्शन मार्चमध्ये सलग खात्यात जमा झाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, ‘डीबीटी’ प्रणालीमुळे बचत खात्याला ९०० लाभार्थ्यांचे आधारकार्ड मॅपिंग नव्हते. सद्यस्थितीत त्यातील ४०० हून अधिक जणांना पेन्शन प्राप्त झाली असून उर्वरितांनी येथील संजय गांधी योजना विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करत तहसीलदार सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याला ३५ ते ४० प्रकरणे शहानिशा करून मंजूर केली जात असल्याची माहिती सहाय्यक महसूल अधिकारी संजय मद्रे यांनी दिली.