आग भडकल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण; अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात
रत्नागिरी । प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ॲम्बेसेडर प्लाझा आणि ब्रुक्स या अपार्टमेंट शेजारील मोकळ्या जागेतील कचऱ्याला आज सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे धुराचे लोळ दिसू लागले. धूर आजूबाजूच्या इमारतीकडे पसरू लागला. त्यानंतर नगर परिषदेच्या दोन अग्निशामकाना तेथे पाचारण करण्यात आले.
आगीचे ठिकाण अत्यंत अवघड आणि जेथे वाहन, अग्निशामक जाऊ शकत नाहीत, अशा जागी होते. त्यामुळे छोटा अग्निशामक नेऊन खोल भागातील ही आग उंच जागी राहून अग्निशमन कर्मचाऱ्यांना नियंत्रणात आणताना कसरत करावी लागली. मात्र काही वेळानंतर दोन्ही अग्निशामकांचा वापर करून आग विझविण्यात यश आले. या भागातील कचरा वाऱ्याने अधिक प्रमाणात पेटला आणि आग आजूबाजूला पसरण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र वेळीच नगर परिषदेचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.













