कळसुलकर इंग्लीश स्कूल येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन मार्फत कॅरम खेळामधे करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी तीन वेळचे विश्वविजेते श्री योगेश परदेशी यांच्या बहुमुल्य मार्गदर्शनाखाली १ जून ते ६ जून २०२३ या कालावधीत कळसुलकर इंग्लीश स्कूल, सावंतवाडी येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.
इंडियन ऑईल पुरस्कृत कॅरम कोचिग कॅम्प अत्तापर्यंत ५ वेळा जिल्हा कॅरम असोसिएशन मार्फत आयोजित करण्यात आला. इंडियन ऑईल तर्फे प्रतिनिधीत्व करणारे कॅरम खेळातील सचिन तेंडुलकर म्हणून परिचित असलेले विक्रमवीर श्री योगेश परदेशी, पुणे यांनी सिंधुदुर्ग मधील ज्युनिअर्सना अशा प्रकारे प्रशिक्षित केले की गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत राज्यच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सिंधुदुर्गच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.
आज महाराष्ट्राच्या ज्युनिअर बरोबर सिनिअर संघामधे देखील आपल्या जिल्ह्यातील मुला-मुलीनी स्थान पटकावले आहे. विविध बक्षिसे आणि शिष्यवृत्त्या मिळवत कॅरम खेळामधे करीयर होऊ शकत हा आदर्श जिल्ह्यातील शालेय मुलांसमोर ठेवत आहेत.
इंडियन ऑईल कंपनीने आपली सामाजिक बांधिलकी जाणत नेहमीच सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या कोचिंग कॅम्प व विविध कॅरम स्पर्धांना प्रायोजकत्व बहाल केले आहे.
या कॅरम प्रशिक्षण शिबिराचा लाभ जिल्ह्यातील उदयोन्मुख कॅरम खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहिती साठी असोसिएशनचे सेक्रेटरी योगेश फणसळकर ( ७६२०७५५७६६ ) यांच्याशी संपर्क करावा.