SANGMESHWAR: पिण्याच्या पाणी टंचाईवर उपाय म्हणुन लोकांमधून मदतीचा हात पुढे.

दहा गावांच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप कडून प्रयत्न

संगमेश्वरः रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असणाऱ्या उमरे धरण लिकेज असल्याने महिनाभरापूर्वीच पाणीसाठा वाहुन गेला आहे. या धरणातून आजूबाजूच्या दहा गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सध्या पाणीपुरवठा संपुर्ण बंद झाल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनातर्फे केलेली टँकरची उपाययोजना अनियमित आणि अपुरी असल्याने नागरिकाना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यावर मात करण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून तरुणाईने एकत्र येऊन शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. या ग्रुपतर्फे गरजवंतांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे त्यांच्या या उपक्रमात जनसामान्यांनाही सहभाग दिला असुन त्यांना मुंबई, ठाणे येथून सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही येथील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा प्रचंड सामना करावा लागत आहेत. प्रचंड उन्हाळा त्यात गावोगावी लग्नकार्ये आणि वार्षिक उत्सव, मे महिन्यातील शालेय सुट्टया यामुळे अनेक चाकरमणी सुद्धा गावा गावातुन मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. प्रशासनाचे प्रयत्न तुटपुंजे पडत असुन आम्ही या कार्यात खारीचा वाटा उचलत असल्याचे निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले. जिमन आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्या गावांमध्ये अजिबात पाणी पुरवठा होत नाही, तिथे खासगी पातळीवर टँकरद्वारे पाणी पुरवण्याचे ठरवले. या कार्यात या तरुणाईला मुंबईतील चाकरमान्यांकडून उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी टँकरच्या भाड्याचे, पाण्याचे मूल्य म्हणून आपल्या परीने आर्थिक सहकार्य केले आहे. या देणगीतून टंचाईग्रस्त गावांना नियमित पाणी पुरवठा केला जात आहे.
निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून दीपक पवार, उदय मालप, मुकुंद सनगरे संजय मालप , योगेश मालप, नितेश मालप अरुण मालप जगदीश कदम तसेच अंत्रवली शेरेवाडीतील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले आहे.
तसेच मुंबई आणि ठाण्यातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांनी विशेष सहकार्य केले आहे. वरील सर्व मदत करणाऱ्यांचे संदेश जिमन आभार व्यक्त केले आहेत.