समाज विकासात पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे : ना. कदम

खेड (प्रतिनिधी)समाजाच्या विकास प्रक्रियेत पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी केले. ‘कोकण मराठी पत्रकार संस्था’ या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण समारंभ गणेश मंगल कार्यालय भरणे येथे झाला, यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात कोकणातील नामवंत पत्रकारांना ‘पत्रकार भूषण’ आणि समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर होते.
यावेळी वेस्टर्न महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष अनिल राजा रोकडे, संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, नंदकुमार गुजराथी,कोषाध्यक्ष संतोष बाणे, प्रकल्प प्रमुख दिलीप देवळेकर, तसेच दिलीप शेट्ये उपस्थित होते.
ना. कदम म्हणाले, माझ्या राजकीय वाटचालीत पत्रकारांचे महत्वाचे सहकार्य राहिले आहे. आज पर्यंत कोणत्याही पत्रकाराने मला कधीही हेतुपूर्वक बातमीत टारगेट केलेले नाही. मला खा. संजय राऊत यांनी एकदा सांगितले होते की आपल्या हातात जो कोणताही कागद येईल तो आपण वाचला पाहिजे. हा
सल्ला मी नेहमीच पाळत आलो आहे. खूप कमी वयात मला राज्यात महत्वाच्या विभागांचे राज्यमंत्री पद मिळाले आहे. ही जबाबदारी पार पाडताना माझ्याकडे असलेल्या सर्वच खात्यांच्या संदर्भात वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचे कात्रण रोज माझ्या पर्यंत पोहोचेल अशी यंत्रणा मी तयार केली आहे. जेणेकरून माझ्याकडे असलेल्या विभागांशी संबंधित समस्या मला तातडीने सोडवता येतील असे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करता येतील. कोकण मराठी पत्रकार संस्थेच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पत्रकाराच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले.
यावेळी समारंभ अध्यक्ष डॉ. सुकृत खांडेकर म्हणाले, माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांच्या समोर अनेक समस्या आहे. शहर ते ग्रामीण भागात काम करणाऱ्या वार्ताहरांना कुटुंब चालवू शकतील, एव्हढे देखील मानधन दिले जात नाही. त्या ऐवजी त्यांना वृत्तसंस्थांचे मालक जाहिरात व्यवसाय करून त्यातून पैसे कमावण्याचा सल्ला देत आहेत. परंतु ज्यांच्याकडे
व्यावसायिक कौशल्य नाही असे वार्ताहर जाहिराती गोळा करू शकत नसल्याने चांगली लेखणी असून देखील पत्रकारितेतून बाहेर जात असल्याची खंत व्यक्त केली.