कुठे बीड अन्…… सिंधुदुर्ग… नुसतच राजकारण…!

संतोष वायंगणकर 

महाराष्ट्रात कुठे काही घडलं की लगेच बीड जिल्ह्याच्या घटनेशी जोडले जाते. बीड जिल्ह्यात काय घडलं किंवा काय घडतयं याचा पोलिसी तपास सुरू आहेच. त्यात जे सत्य आहे ते निश्चितच महाराष्ट्रासमोर येईलच. परंतु चेंदवण (ता.कुडाळ) येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर खून प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे. हे प्रकरण पोलिस आणि न्यायालयीन पातळीवर आहे. मात्र, सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरणात त्याचा खून झाला. तो खून कशासाठी झाला, तो खून कोणी केला हा सर्व पोलिस तपासाचा भाग आहे. सिंधुदुर्ग पोलिस या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत आहेत. तपास कामात कोणतेही दोष राहू नयेत याची काळजी पोलिस घेत आहेत. असे असतानाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या संपूर्ण प्रकरणाच्याबाबतीत जे राजकीय स्टेटमेंट केले ते पूर्णत: अयोग्य आणि केवळ राजकीय द्वेषमूलक म्हणता येईल असेच आहे. सिद्धिविनायक बिडवलकर याचं गायब होणं नंतर त्याचा खून झाल्याचा प्रकार समोर येणं हे सर्व घडलं ते दोन वर्षापूर्वी ,मग दोन वर्षापूर्वी कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक स्वत:च होते. आज या बिडवलकर प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक बोलत आहेत. त्या वैभव नाईक यांनी या प्रकरणाबद्दल मागील दोन वर्षात केव्हातरी या प्रकरणासंबंधी कधी साधी स्टेटमेंट केल्याचे सिंधुदुर्गात तरी कोणाला माहिती नाही. नेहमीप्रमाणे त्यांनी राजकीय स्टेंटमेंट केली आहे. मात्र, यावेळी वैभव नाईक यांनी बीड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोणतही कारण नसताना बदनामी केली आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी वापरलेल्या ‘आका’ या शब्दाचा वापर करीत कोणतही कारण नसताना केवळ द्वेष आणि आकसापोटी सिंधुदुर्गात बीड सारख घडतय असा खोटा आभास निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. वास्तविक राजकारणासाठी स्टेटमेंट करतानाही आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याला बदनाम करतोय याच भान आणि जाणीव असण्याची आवश्यकता होती. परंतु कोणत्याही गोष्टीच राजकारण करण्याचा आ.वैभव नाईक यांची कार्यपद्धती आहे. हे जनतेने आजवर पाहिले आहे. बिडवलकर खून प्रकरणाचा सखोल तपास व्हावा जे या प्रकरणात संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलिस तपासाने न्यायालयात निश्चितच शिक्षा होईल. नियती कधीच कोणाला माफ करत नाही. त्याचा योग्य पद्धतीने हिशोब होतोच. त्यामुळे बिडवलकर खून प्रकरणात ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना योग्य ती शिक्षा होईलच आणि कोणी वाचवण्यासाठी प्रश्न येत नाही. परंतु या बिडवलकर खून प्रकरणाच्या निमित्ताने माजी आ.वैभव नाईक यांनी ज्यापद्धतीची राजकीय स्टेटमेंट केली या स्टेटमेंटमध्ये सिद्धिविनायक बिडवलकर याला न्याय मिळण्याऐवजी त्याच्या प्रकरणाच्या आडून राजकारण करण्याचा वैभव नाईक यांचा प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आजवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे द्वेषाने पछाडलेल्या राजकीय नेते, पुढाऱ्यांनी कोणत्याही घटनेशी दुरान्वयेही संबंध नसतानाही राणेंच नाव जोडण्याचा प्रयत्न केलेला दिसेल. मात्र, तरीही कोकणातील विशेषकरून नेहमीच सिंधुदुर्गातील जनता राणेंची साथ करत आली आहे. अगदी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतही सिंधुदुर्गची जनता राणेंच्या पाठीशी खंबिरपणे उभी राहिलेले मतदानातून दिसून आले आहे. राणे विरोधकाना सहा महिन्यांपूर्वीच सिंधुदुर्गातील जनतेचे खरंतर चोख उत्तर दिले आहे. या धक्क्यातून अजूनही राणे विरोधक सावरलेले दिसत नाहीत. यामुळेच केवळ अस्तित्व तर रहावं यासाठीच अशा प्रकारची स्टेटमेंट केली जातात. राजकारण जरूर केलं जावं. परंतु राजकारणासाठी राजकारण न करता, सिंधुदुर्गची बदनामी न करता केलं जावं. मागील पंचवीस वर्षे दहशतवादावर अशीच चर्चा केल्या नंतरही सिंधुदुर्गच्या जनतेने राणेंचीच पाठराखण केली. यातून खरंतर खूप काही समजून घेता येण्यासारख आहे. सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरणाच कोणीही समर्थन करत नाही आणि करणारही नाही. त्यातील संशयित आरोपींना जी शिक्षा असेल ती मिळेलच फक्त नाहक सिंधुदुर्गची बदनामी नको इतकच !