कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे आणले निदर्शनास
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल कॉलेज, तळेरे कणकवली तसेच मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसर सावंतवाडी येथे विविध अभ्यासक्रम सुरु आहेत. मात्र, तेथे ३ महिन्यांपासून अधिक काळ लिपीक, शिपाई तसेच सफाई कामगार आदी पदे रिक्त आहेत. त्यामूळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ही सर्व पदे तत्काळ भरा अन्यथा सर्व सुरळीत होईपर्यंत विद्यालय बंद ठेवा अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन व्यवस्थापनाला सादर करण्यात आले आहे. याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास नाईलाजाने सदर आस्थापना मनसेला बंद करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मॉडेल कॉलेज, तळेरे तसेच मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसर सावंतवाडी येथे विविध अभ्यासक्रमांसाठी साधारण ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या ठिकाणी एकही स्थायी कर्मचारी पाठविलेला नसून स्थानिक हंगामी कर्मचारी नेमून या दोन्ही ठिकाणी काम पहिले जात होते. परंतु गेल्या ३ महिन्यापेक्षा अधिक काळापासून येथे लिपिक,शिपाई आणि मुख्य म्हणजे एकही सफाई कर्मचारी उपलब्ध नाही, सफाई अभावी वर्गात व शौचालयात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे, विद्यार्थ्यांना अशा अस्वच्छ वातावरणात बसून अध्ययन करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
मुंबई विद्यापीठ ,सिंधुदुर्ग उपपरिसराची स्थापना झाल्या नंतर येथील स्थानिक युवकांना रोजगारभिमुख येथे व्यवसायभिमुख १२ कोर्सेस ची विद्यापीठाने जाहिरात केलेली आहे तसेच समाजकार्य पदव्युत्तर पदवी ( एम एस डब्लू) हा पूर्णवेळ पोस्ट पदवी कोर्स चालू आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी,अभ्यासक्रमांची माहिती मिळविण्यासाठी येत असतात. परंतु सध्या कर्मचारी नसल्यामुळे अभ्यागतांना हि त्रास सहन करावा लागत आहे.
वास्तविक सिंधुदुर्ग उप परिसराची स्थापना झाल्या नंतर तेथील कोर्स चा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे परंतु या ठिकाणी विद्यापीठाची अनास्था दिसून येत आहे.
विद्यापीठाला तातडीने हा विषय हाताळता येत नाही आहे किंवा या गोष्टींचे गांभीर्य नाही अस निदर्शनास येत असल्याचे मनसेने सदर निवेदनात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग उपपरिसर सावंतवाडी व मॉडेल कॉलेज, तळेरे,कणकवली हि बंद पाडण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न दिसून येतो. तरी आपल्याकडून सुरळीत होई पर्यंत ही विद्यालये बंद ठेवावीत व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, अन्यथा आम्हाला बंद ठेवावी लागतील याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठाची राहील, असा इशाराही मनसेतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस, सचिव कौस्तुभ नाईक, आकाश परब, मनोज कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Sindhudurg