Dr. Dnyaneshwar Durbhatkar is the blessed angel for Sawantwadikar : Raju Masurkar
सेवानिवृत्ती कार्यक्रमात सहकार्यांसह सावंतवाडीकर नागरिकही झाले भावूक
सावंतवाडी । प्रतिनिधी : देव प्रत्येकाच्या मदतीला धावून जाऊ शकत नाही यासाठी तो आपला दूत कोणाच्यातरी रूपाने पाठवतो. डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर
हे अशाच हजारो गर्भवती महिलांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले. त्यांनी केलेली निष्काम सेवा सावंतवाडीकरांच्या नेहमीच स्मरणात राहील, असे गौरवोद्गार जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी काढले. दरम्यान, डॉ. दुर्भाटकर यांच्यानंतर त्यांच्या प्रमाणेच सेवा देणारा प्रसुती तज्ञ या रुग्णालयाला लाभावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. वैद्यकीय अधिक्षक व स्त्रीरोगतज्ञ अशी दूहेरी जबाबदारी त्यांनी मागील वर्षभर सांभाळली होती. गेल्या २३ वर्षांच्या रूग्णसेवेत त्यांनी निस्वार्थी रूग्णसेवा केली. आजवर हजारो गर्भवती महिलांच्या प्रसुती त्यांच्या कार्यकाळात झाल्या. नव्या जीवाला जन्म देण्यासह मातेला पुनर्जन्म त्यांच्या माध्यमातून झाल्यानं रूग्णालयातील ‘देव माणूस’ अशी ओळख त्यांनी जिल्ह्यात निर्माण केली.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या सेवानिवृत्त समारंभात उपस्थितांकडून त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा देत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या. मुळ गोवा येथील असलेले डॉ. दुर्भाटकर यांच कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. गेली २३ वर्ष आपण जी काही सेवा करू शकलो ते केवळ ईश्वराच्या आशीर्वादाने शक्य झाल्याच डॉ. दुर्भाटकर म्हणाले.
याप्रसंगी डॉ. जयेंद्र परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. सौ. देशपांडे, डॉ. उत्तम पाटील, डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. नागरगोजे आदींनी मनोगत व्यक्त करत डॉ. दुर्भाटकर यांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी सावंतवाडीकरांना दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी वर्गाकडून डॉ. दुर्भाटकर यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर शल्यचिकित्सक डॉ. बी.एस. नागरगोजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शल्यचिकित्सक डॉ. बी.एस. नागरगोजे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, सौ. नाडकर्णी-दुर्भाटकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. अभिजित चितारी, डॉ. चौगुले, रूग्ण कल्याण समिती सदस्य अशोक दळवी, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर यांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.