सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरत गावडे यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्य अध्यक्ष म्हणून वि ना लांडगे (सातारा), सचिवपदी पांडुरंग सुतार (सातारा), संपादकपदी गणेश रा देशपांडे (सोलापूर) यांची निवड करण्यात आली. अध्यापक संघाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली.
भरत गावडे १९९६ पासून गेली २६ वर्षे महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाच्या कार्यरत आहेत. या कार्यकाळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात तीन राज्यस्तरीय कृतीसत्रे आयोजित करून यशस्वी केली आहेत. मराठी भाषा समृद्धी व विकासासाठी शहरासह ग्रामीण भागात सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात. सध्या ते मराठी भाषेचे तज्ञ मार्गदर्शक व साधनव्यक्ती म्हणून राज्यासह विभाग व जिल्हास्तरावर कार्यरत आहेत.
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच
मराठी भाषा विकास कौशल्य या उपक्रमांतर्गत त्यांनी राज्यात तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांसह माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्येही त्यांनी अनेक उपक्रम राबविले. राज्य व जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत अनेक पारितोषिकही त्यांनी पटकाविली. वाचक मेळावे प्रशिक्षण वर्ग निवड श्रेणी बदलती पाठ्यपुस्तके याबाबत मार्गदर्शक म्हणूनही ते परिचित आहेत.
गेल्या पाच वर्षात मराठी त्रैमासिकाचे संपादक म्हणून त्यानी यशस्वी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या पदावर त्यांची निवड करण्यात आली आहे. मराठी अध्यापक संघाच्या राज्य कार्यकारणीत मानाचे पद मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
Sindhudurg