राजापूर शहराचा इको सेंसेटिव्ह झोन मध्ये समावेश

 

 

विकासाला बसणार खिळ

 

तालुक्यातील 48 गावांचाही इको सेंसेटिव्ह झोन मध्ये समावेश

 

राजापूर l प्रतिनिधी :

गवठाण जमीन, देवस्थान इनाम जमीन, नगर परिषदेची विकास आराखड्यातील आरक्षणे यांच्या जोडीला नव्याने विस्तारलेली पूररेषा यामुळे राजापूर शहराचा भविष्यकालिन विकास खुंटलेला असताना आता राजापूर म्युनिसिपल क्षेत्र केंद्र शासनाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ठ झाल्याने शहर विकासाला अनेक प्रतिबंध अडसर ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांना राजापूर गावच सोडण्याचा एकमेव पर्याय उरलेला दिसू लागला आहे.

 

पश्चिम घाट संवर्धनांतर्गत केंद्र शासनाच्या विविध समित्यांनी सूचविलेल्या परिसंवेदनशील क्षेत्र अर्थात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये राजापूर नगर परिषद क्षेत्रासह तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. यामध्ये झर्ये वाटूळ, येरडव, कोंडदसूर, परूळे, चिखले, कोडसरखुर्द, तिवरे, धामणपे, हरळ, वरची गुरववाडी, कोतापूर, कोळवणखडी, सौंदळ, खिणगिणी, केळवडे, पाथर्डे, पाचल, आगरेवाडी, भराडे, करक, हर्डी, गोठणेदोनिवडे,ओशिवळे, वाळवड, काजिर्डा, कोळंब, पहिलीवाडी ताम्हाणे, जांभवली, मिळंद, बाग काझी हुसेन, हसोळ तर्फे सौंदळ, पांगरीबुद्रुक, सावडाव, हातदे, डोंगर, मोसम, महाळुंगे, पन्हळे सौंदळ, शेजवली, वाल्ये, बांदिवडे, प्रिंदावण, कुंभवडे, वाल्ये या गावांचा समाविष्ठ आहेत.

 

उंच सखल भागात वसल्याने राजापूर शहराच्या विकासात आधीच अडथळे निर्माण झालेले असताना त्यातच गावठाण, देवस्थान इनाम मिळकती, नव्याने लादलेल्या वाढीव पूररेषेमुळे नागरिकांना घरांच्या बांधकामांना आलेले बंदी आदेश शिवाय नगर परिषदेची विविध आरक्षणे यामुळे शहरवाढीला मर्यादा आलेल्या आहेत. त्यातच आता केंद्र शासनाने राजापूर शहराचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये केल्याने शहर विकासाचा पूरता खेळखंडोबा झाला आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये राजापूर शहराचा निर्णय अंतीम झाल्यास एक ऐतिहासिक शहर एवढीच राजापूरची ओळख उरणार आहे. त्यामुळे राजापूर शहर आणि तालुक्याच्या अस्तित्वासाठी आता कणखर स्थानिक नेतृत्वाची गरज भासू लागली आहे. राजापूरवासीयांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. बीएसएनएल, कोकण रेल्वेशी निगडित राजापूरवासियांच्या मागण्यांना तर कोणी धूप घालत नसल्याचे गेल्या वीस वर्षांत दिसून आले आहे. त्यामुळे राजापूरवासियांना स्वअस्तित्वासाठी आता स्वतःच पुढाकार घेऊन लढा उभारावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

फोटो राजापूर नगर परिषद

 

 

 

 

 

……………………………………..