ओडिशा हृदयद्रावक ट्रेन अपघात , प्रथमदर्शनी कारण आले समोर

आतापर्यंत 288 जण ठार , 1175 जखमी , 2 जण गंभीर जखमी

ओडिशातील बालासोर येथील बहनगा बाजार येथे शुक्रवारी झालेल्या हृदयद्रावक रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देशात अवकळा पसरली आहे .तीन गाड्यांच्या टक्करीच्या या अपघाताचे प्रथमदर्शनी कारण समोर आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ANI न्यूजला सांगितले. तर या भीषण अपघातात मृतांची संख्या २८८ वर पोहोचली आहे. 1175 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी 793 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 382 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि इतर जखमींना

50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सलग दुसऱ्या दिवशी ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातस्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ट्रेनचे कारणही सांगितले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताचे कारण शोधण्यात आले आहे. याला जबाबदार असलेल्या लोकांचीही ओळख पटली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला.

काल पंतप्रधानांनी अपघात स्थळाला भेट दिली होती तसेच रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस केली होती . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ओडिशा मुख्यमंत्री नवीन पटनायक केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील अपघात आणि रुग्णालयांना भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील अपघाताचा , बचाव कार्याचा वरिष्ठ स्तरावरील बैठक घेत आढावा घेतला . पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशानुसार काम वेगाने सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. काल रात्री ट्रॅकचे काम जवळजवळ पूर्ण झाले. आज एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व डब्बे रुळावरून काढण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. काम वेगाने सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंत सामान्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढे दिली .